Dalimb Niryat : चालू वर्षात एप्रिल ते जानेवारी 2024-25 या कालावधीत डाळिंब निर्यातीमध्ये (Pomegranate Export) 21 टक्के वाढ झाली असून 59.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याची नोंद झाली आहे. मुख्य निर्यात लक्ष्य राष्ट्रांमध्ये युनायटेड अरब एमिरेट्स , बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहारीन, ओमान आणि अमेरिका यांचा समावेश होतो.
भारत हा बागायती पिकांचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. एपीडाने डाळिंबाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी विशेष डाळिंब निर्यात प्रचार मंच ( इपीएफ) स्थापन केले आहेत. या मंचामध्ये वाणिज्य विभाग, कृषी विभाग, राज्य सरकारे, राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळा आणि दहा आघाडीचे निर्यातदार यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत, जे डाळिंबाच्या निर्यातीसाठी एकत्रितपणे काम करतात.
जागतिक बाजारपेठेत भारतीय ताज्या फळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) कायमच आघाडीवर राहून पुढाकार घेत आले असल्याचे अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या निर्यातपूर्व नियमांच्या पूर्तता प्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य देत अपेडाच्या वतीने आंबा (Mango) आणि डाळिंबांसारख्या (Pomegrante Export) भारतीय फळांच्या अमेरिकेतील निर्यातीला पाठबळ दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जेव्हा भारतीय शेतकऱ्यांची फळे अमेरिकेसारख्या सर्वात महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होतील तेव्हाच त्यांना चांगला भावही मिळू शकेल असे ते म्हणाले. भारतीय आंब्याची वार्षिक निर्यात सुमारे 3500 टनांपर्यंत पोहोचली असून, आगामी काळात डाळिंबाची निर्यातही अशाच प्रकारची मजबूत आकडेवारी गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 2023 -24 मध्ये 72011 मेट्रिक टन डाळिंबांची निर्यात केली, तर जानेवारी ते एप्रिल 2024-25 या कालावधीत डाळिंब निर्यातीमध्ये 21 टक्के वाढ झाली असून 59.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याची नोंद झाली आहे.
दीर्घकालीन निर्यातीसाठी संधी
भारतीय डाळिंबे, विशेषतः भगवा जातीची, त्यांच्या समृद्ध चव, गडद लाल रंग आणि उच्च पोषणमूल्यामुळे प्रसिद्ध आहेत. ही डाळिंबे अँटीऑक्सिडंट्स आणि अत्यावश्यक पोषक घटकांनी भरलेली असतात, ज्यामुळे ती जगभरातील आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहेत. हा उपक्रम भारताची जागतिक बाजारपेठेतील स्थिती अधिक मजबूत करत असतानाच, भारतीय शेतकऱ्यांना दीर्घकालीन निर्यातीसाठी संधी उपलब्ध करून देतो.