Join us

येवला बाजार समितीत राडा, शेतकरी-हमाल मापारी यांच्यात खासगी मार्केटवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 3:37 PM

येवला बाजार समितीमध्ये खासगी कांदा मार्केट सुरु करण्यावरून राडा झालेला आहे.

नाशिक : एकीकडे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरळीतपणे सुरु झाले. मात्र दुसरीकडे येवला बाजार समितीमध्ये खासगी कांदा मार्केट सुरु करण्यावरून राडा झालेला आहे. येथील शेतकरी हमाल मापारी यांच्यात हाणामारी झाली असून बाजार समितीमध्ये बाहेरील लिलावावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी हस्तक्षेप करत ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. 

दिनांक 12 एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नोंदणी कृत व्यापाऱ्यांनी संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी न करता खाजगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता, मात्र या उत्पन्न बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी तीव्र विरोध केला. यामुळे शेतकरी व हमाल मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले.  तसेच या ठिकाणी झालेल्या दगडफेकीमध्ये एक शेतकरी जखमी झाला असून चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात असल्याचे समजते आहे. 

गेल्या दहा बारा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्री व्यवहार बंद आहेत. हमाल मापारी यांना लेव्ही देण्यावरून वाद सुरु आहे. जोपर्यंत लेव्हीचा वाद सुटत नाही, तोपर्यंत या ठिकाणी खरेदी विक्री सुरु होणार नाही अशी परिस्थिती संपूर्ण बाजार समित्यांमध्ये आहे. त्यामध्ये आज लासलगाव बाजार समितीने कांदा खरेदी व्यवहार सुरू केले.

याच पार्श्वभूमीवर आज येवला बाजार समिती परिसरात खासगी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्या ठिकाणी लिलाव सुरु होणार होते, मात्र याचवेळी येथील हमाल मापारी यांनी संबंधित जाऊन गोंधळ घातला. यावरून दोन गटामध्ये वाद सुरु होऊन हाणामारीत रूपांतर झाल्याचे  दिसून आले. यात एक शेतकरी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :शेतीकांदानाशिकबाजारमार्केट यार्ड