- सुनील चरपे
नागपूर : देशात कापसाचे सरासरी लागवड क्षेत्र कायम असले तरी मागील १० वर्षांत कापसाचे सरासरी उत्पादन २६ टक्क्यांनी घटले आहे. कृषी निविष्ठांसह मजुरीच्या दरात माेठी वाढ झाली असताना कापसाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकार वारंवार टेक्सटाइल लाॅबीला पूरक निर्णय घेत असल्याने कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात ६५ टक्क्यांनी घट झाली आहे.
देशात ११५ ते १२६ लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड केली जाते. काेरडवाहू उत्पादकता प्रतिएकर सरासरी ५ क्विंटल व उत्पादनखर्च प्रतिएकर २० हजार रुपये तर ओलिताखालील कापसाचे उत्पादन एकरी ८ क्विंटल आणि उत्पादनखर्च २५ हजार रुपये आहे. सन २०१९ ते २०२४ या काळात केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रासायनिक खतांच्या बॅगचे वजन १० टक्क्यांनी कमी केल्याने किमती ७ टक्क्यांनी वाढल्या तर कीटकनाशकांच्या दरात सरासरी २५ तर मजुरीच्या दरात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात इंधन दरवाढीचीही भर पडली. त्यामुळे कापसाचा उत्पादनखर्च सरासरी ५२ टक्क्यांनी वाढला आहे.
सन २०१४ ते २०२३ या १० वर्षांत केंद्र सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल २,९७० रुपयांनी तर सन २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत प्रतिक्विंटल १,४७० रुपयांनी वाढ केली आहे. तुलनेत कृषी निविष्ठा व इतर दरवाढ माेठी आहे. कापड उद्याेगाला कमी दरात कापूस हवा असल्याने त्यांच्या दबावामुळे कापसाच्या आयातीवर भर दिला जात असून, जागतिक बाजारात भारतीय कापसाला मागणी असूनही निर्यात मात्र वाढविली जात नाही.
कापसाचे सरासरी दर व एमएसपी (रुपये/प्रतिक्विंटल)वर्ष ............. दर ..... एमएसपी१) २०१९-२० - ५,४३० - ५,५५०२) २०२०-२१ - ५,४३० - ५,८२५३) २०२१-२२ - ८,९५८ - ६,०२५४) २०२२-२३ - ७,७७६ - ६,३८०५) २०२३-२४ - ७,३५० - ७,०२०...कापसाची आयात व निर्यात (लाख/गाठी)वर्ष ............. आयात... निर्यात१) २०१९-२० - १५.५० - ४७.०४२) २०२०-२१ - ११.०३ - ७७.५९३) २०२१-२२ - १४.०० - ४३.००४) २०२२-२३ - १२.५० - ३०.००५) २०२३-२४ - २२.०० - १४.००
रुईचे दर कमी, कापडाचे वाढलेजागतिक बाजारात सन २०११-१२ मध्ये रुईचे दर २ डाॅलर ४० सेंट तर सन २०२१-२२ मध्ये १ डाॅलर ७० सेंट प्रतिपाउंड हाेते. ते यावर्षी ९५ सेंटवर आले आहेत. सन २०२१-२२ मध्ये रुईचे दर १ लाख ५ हजार रुपये प्रतिखंडी झाल्याने कापडाचे दर वाढले. सन २०२२-२३ च्या हंगामात रुईचे दर सरासरी ६३ हजार रुपये आणि सन २०२३-२४ मध्ये हेच दर सरासरी ५२ हजार रुपये प्रतिखंडीवर आले. तीन वर्षांत रुईचे दर किमान ५० टक्क्यांनी घटले तरी कापडाची दरवाढ कायम आहे.
उत्पादकता व निर्यात वाढवासन २००९ मध्ये कापसाच्या बाेलगार्ड-२ या वाणामुळे देशात ४१६ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले हाेते. यावर्षी भारताने ११५ लाख गाठी कापूस निर्यात केला हाेता. आता ही निर्यात १५ ते २५ लाख गाठींवर आली आहे. कापूस उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जीएम बियाणे वापरण्याला परवानगी देणे, कापसाची उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, दरवर्षी किमान ७० ते ७५ लाख गाठी कापसाची निर्यात करणे व निर्यातीत सातत्य ठेवणे आवश्यक आहे.