- सुनील चरपे
नागपूर : राज्याच्या काही भागातील शेतकरी कापसाच्या (Cotton Verity) विशिष्ट वाणाबाबत आग्रही असून, त्या वाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वास्तवात, तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण देशात कापसाच्या बियाणांचे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे, वापर व मागणीत किमान दीड ते दुपटीने वाढ झाली आहे. असे असले तरी महाराष्ट्रात बियाण्याचा तुटवडा नसून, पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी चिंता न करता सक्षम पर्यायी वाणांचा शाेध घेणे गरजेचे आहे.
बियाणे उत्पादक कंपन्या देशाभरात गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीने कापसाचे सर्वाधिक सीड (Cotton Seed Plot) प्लाॅट घेतात. एकदा तयार केलेले बियाणे किमान तीन वर्षे वापरले जाते. वर्ष २०२१-२२, वर्ष २०२२-२३ व वर्ष २०२३-२४ मधील खरीप हंगामात अतिपाऊस, दमट व प्रतिकूल वातावरणासाेबतच बाेंडसड आणि गुलाबी बाेंडअळीचा सीड प्लाटला जबर फटका बसला. त्यामुळे बियाणे उत्पादन घटले असून, जे बियाणे हाती आले, त्यातील दर्जेदार बियाणे कंपन्यांनी बाजारात आणले. याच काळात बियाणांच्या सेल रिटर्नचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २५ ते ३० टक्क्यांवर आले आहे.
अलीकडे, बहुतांश शेतकरी प्रतिएकर दाेनऐवजी तीन पाकिटे बियाणे वापरतात. सघन व अतिसघन पद्धतीने कापसाची लागवड करणारे शेतकरी प्रतिएकर चार ते सहा पाकिटे वापरत असल्याने बियाण्याचा वापर व मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत बियाण्यांचा तुटवडा नसून, पुरेसे बियाणे उपलब्ध आहे.
बियाण्याची सरासरी मागणी
महाराष्ट्रात ५५ ते ६० कंपन्या कापसाचे बियाणे उपलब्ध करून देतात. राज्यातील बियाण्यांची सरासरी मागणी १ काेटी ६० लाख पाकिटे असून, कंपन्यांनी १ काेटी ७३ लाख पाकिटे पुरवठ्याचा प्लान राज्याच्या कृषी विभागाला दिला आहे. यातील १ काेटी ३१ लाख पाकिटे बाजारात विक्रीला उपलब्ध असून, उर्वरित बियाणे २ ते ५ जूनदरम्यान बाजारात विक्रीला येणार आहे.
विशिष्ट वाणाची मागणी का?
ज्या वाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे, ते विदर्भातील खारपाणपट्ट्यात सर्वाधिक वापरले जाते. या वाणाच्या पानांवर बारीक काटेरी लव असल्याने ते रस शाेषण करणाऱ्या किडींना बळी पडत नाही. उत्पादन खर्च थाेडा कमी असल्याने ते वाण या भागात लाेकप्रिय झाले आहे. या भागात याच वाणाची मागणी वाढल्याने व बियाणांचे उत्पादन कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. या वाणाचा साठा संपल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून, याला कंपनी व्यवस्थापनाने दुजाेरा दिला आहे. विशेष म्हणजे, शेतकरी विभाग व जिल्हानिहाय वेगवेगळे वाण वापरतात.
पेरणीची वेळ १२ ते १५ दिवसांवर आली आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाबाबत आग्रही राहू नये. फजिती टाळण्यासाठी पर्यायी सक्षम वाणांचा वेळीच शाेध घ्यावा व ते वापरावे. कारण, इतर कंपन्यांचे चांगले वाण उपलब्ध आहेत.
- दिलीप ठाकरे, कापूस उत्पादक तथा सदस्य एमसीएक्स काॅटन (पीसीए)