भंडारा : वाढलेला लागवड खर्च आणि उत्पादनात झालेली घट पाहता यंदा धानाला (Paddy) प्रतिक्विंटल किमान २४०० रुपये भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकारी दर २१८३ रुपये असल्याने खासगी व्यापाऱ्यांकडे दर वाढतील, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी घरात धान राखून ठेवले आहे.
नगदी पीक म्हणून भंडारा (Bhandara) जिल्ह्यात शेतकरी धानाकडे पाहतात. खरिपात इतर पिकांच्या तुलनेत सर्वाधिक लागवड क्षेत्र धान पिकाचे असते. यावर्षी जवळपास ७० टक्केच शेतकऱ्यांनी धान पिकाचा पेरा केला होता. परंतु, अवकाळी पावसाचा (rainy Season) लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत किमान २४०० रुपये इतके भाव मिळणे अपेक्षित होते, परिणामी शेतकऱ्यांचा धान (Paddy Cultivation) उत्पन्नातून लागवड खर्चही भरून निघाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत मागील दोन महिन्यांपासून विक्रीविना धान ठेवले आहे. परंतु, भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.
दीड महिना उशिराने धान खरेदी
खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल मिलर्सने केली नाही. परिणामी रबीतील धान खरेदी यंदा तब्बल दीड महिना उशिराने सुरू झाली. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना गरजेपोटी अल्प दराने धानाची विक्री करावी लागली. आज ना उद्या धानाचे भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी तब्बल दोन महिने धान विक्रीविना आपल्या घरी ठेवले. मात्र, अजूनही भाव कमीच आहेत. आता पेरणीचे दिवस जवळ येऊ लागल्याने मिळेल त्या भावात शेतकरी धान विक्री करीत आहेत.
शेतकरी उमराव मस्के म्हणाले की, मागील महिन्यांपासून धान दरवाढीची प्रतीक्षा आहे. परंतु, अजूनही पडतेच दर आहेत. सध्याच्या भावानुसार लागवड व मशागतीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. तर शेतकरी शरद भूते नगदी पीक म्हणून धानाकडे पाहिले जाते. परंतु, मागील दोन वर्षांत उत्पादनात घट आणि पडत्या भावामुळे धान पिकाची लागवड करणे परवडत नाही. शासनाने हमीभावात वाढ करणे आवश्यक आहे.
धानाचे भाव वाढणार का?
धान भरडाई सुरू झाल्यास धानाचे दर वाढू शकतात. गेल्या तीन महिन्यांपासून राइस मिलर्स व राज्य सर कारमध्ये धान वाहतूक व भरडाईच्या दरावरून वाटाघाटी सुरू आहेत. सद्यस्थितीत खासगी व्यापाऱ्यांकडून २१५० ते २२५० रुपये दर मिळत आहे. तर धानाला प्रतिक्विंटलचा हमीभाव २१८३ रुपये असा आहे. आजच्या बाजार अहवालानुसार बाजारभाव पाहिले असता धानाला गडचिरोली बाजार समिती जय श्रीराम वाणाला क्विंटलमागे 2500 रुपयांचा सरासरी दर मिळाला. त्यानंतर आर्मी देसाईगंज बाजार समितीत क्रांती धानाला सरासरी 2238 तर लांबोर एफ ए क्यू वाणाला 2005 रुपयांचा दर मिळाला.