Join us

थंडी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजरीला मागणी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 12:32 PM

थंडी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजरीला मोठी मागणी वाढली बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक वाढू लागली आहे.

हिवाळा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून उष्णतावर्धक खाद्यपदार्थांना मागणी वाढू लागली आहे. वाढलेली थंडी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजरीला मोठी मागणी वाढली असून मुंबईसह इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक वाढू लागली आहे. आज मुंबईच्या बाजार समितीमध्ये जवळपास 1128 क्विंटल बाजरीची आवक झाली. विशेषतः ग्राहकांची देखील बाजरीला पसंती असल्याचे चित्र आहे. 

महाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, उत्पादन होते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे बाजरीचे देशात राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये बाजरीचे उत्पादन होते. काही प्रमाणात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाबमध्येही उत्पादन घेतले जाते. बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य होते. त्यामुळे ग्राहकांसोबतच हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत असून, भावही नियंत्रणात आल्यामुळे ग्राहकही बाजरी खरेदीला पसंती देत आहेत. 

आवक सुमारे दुपटीने वाढली

सध्या वाशी मार्केटमध्ये नियमित 10 ते 30 टन बाजरीची आवक होते. थंडी सुरू झाल्यापासून रोज 50 टनांपेक्षा जास्त आवक होत आहे. सोमवारी सर्वाधिक 185 टन आवक झाली. राज्याच्या विविध भागांमधून व इतर राज्यांमधूनही बाजरी विक्रीसाठी येत आहे. मुंबई मार्केटमध्ये आज लोकल बाजरीला 1128  क्विंटल आवक झाली. यात बाजरीला कमीत कमीत 2700 रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी 3300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये बाजरी 28 ते 43 रुपये किलो दराने विकली जात होती. आता हे दर 27 ते 37 रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये 45 ते 60 रुपये किलो दराने विक्री होत आहे. 

बाजरी पिकाचे फायदे काय? 

पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे.आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे.कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात.सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो.बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्‍यक कोलेस्टेरॉलचे (LDL) प्रमाण हे मक्‍यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डबाजरी