फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूसचा सिझन सुरू असून आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या बाजारात आंब्याचे विविध प्रकार उपलब्ध असून ग्राहकांचा कल हापूस आंब्याकडे असल्याचे दिसून येत आहे. मात्र हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची खरेदी होत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच इतरही आंब्यांच्या प्रकारांना चांगली मागणी असल्याचे बाजारातील चित्र आहे.
कोकणासह मुंबई, पुण्यासह जळगावच्याही बाजारपेठेत विविध आंब्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपासून बाजारात आंब्याच्या विविध प्रकारांची आवक बाजारात सुरू होते. हापूससह इतर आंब्याचे प्रकारची सर्वाधिक विक्री होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
जळगावच्या बाजारातील आंबे
तोतापुरी :चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा हा आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील, हा आंबा असाच खाण्यासोबतच तो सलाड आणि लोणच्यासाठीही उत्तम आहे.
दशेरी :हा आंबा महाराष्ट्रात दशेरी या नावाने प्रसिद्ध आहे. मात्र उत्तर भारतात हा आंबा दशहरी या नावाने ओळखला जातो. ही उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध अशी प्रजाती आहे. हा आंबा लोबट आकाराचा असतो. साधारणपणे एक वर्षाआड याला फळे येतात.
बंगीनापल्ली :हापूस आंब्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या या आंब्याच्या जातीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बानागनपल्ले येथे केले जाते. त्याचा सुगंध खूप मोहक असून, ते गुळगुळीत सालीसह अंडाकृती आकाराचे असतात आणि त्यांची लांबी सुमारे १४ सेमी असते.
नीलम :हा आंब्याचा आणखी एक प्रसिद्ध प्रकार आहे. नीलम आंबा विशेषतः आंध्र प्रदे प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पिकवला जातो. नीलम आंब्याची सर्वात चवदार प्रजाती आंध्र प्रदेशातून वेते. नीलम हे नाव पाकिस्तानच्या नीलम नदीवरून आले आहे जेथे भरपूर प्रमाणात आंब्यांची लागवड केली जाते.
लंगडा :प्रजाती उत्तर प्रदेशातील बनारस येथील आहे. हा आंबा अतिशय रसाळ आणि गोड असतो. लंगडा आंबा चोखून खाता येत नाही. या आंब्याची साल अतिशय पातळ असते.
कसे आहेत बाजारभाव
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण आंब्याला सरासरी 11 हजार 250 रुपये दर मिळाला. मुंबई फ्रुट मार्केटमध्ये हापूस आंब्याला सर्वाधिक 16 हजार रुपये सरासरी दर मिळाला. पुणे मोशी बाजार समितीत लोकल आंब्याला 10 हजार रुपये सरासरी दर मिळाला. कामठी बाजार समितीत लोकल आंब्याला सर्वात कमी म्हणजे 2500 रुपये क्विंटल सरासरी दर मिळाला.