अहमदनगर : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील रंगपंचमी यात्रेत गाढवांनी भाव खाल्ला. पंजाबच्या जाफरानी जातीची गाढवे दोन लाख रुपये जोडी, काठेवाडीची जोडी एक लाख तर, गावरान वीस ते पन्नास हजार रुपयांना प्रतवारीनुसार विकली गेली. सुविधांची वानवा अन् सुरक्षिततेची हमी नसल्याने बहुतांश विक्रेत्यांनी तिसगाव-पाथर्डी महामार्गालगतच विक्रीच्या दावणी लावल्या. मढी व तिसगाव अशा दोन ठिकाणी बाजार विखुरला गेला.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगपंचमीनिमित्त यात्रा भरली यात्रेत गाढवांचा बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी वेगवगेळ्या जिल्ह्यातून राज्यातून गाढव विक्री साठी दाखल केली जातात. शिवाय अनेक खरेदी करणारे नागरिकही दूरवरून येत असतात. गेल्या वर्षांपासून थेट पंजाबमधून गाढवं विक्रीसाठीआणली जात असून त्यांना भावही चांगला मिळत असल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यातील होळी सणापासून ते पुढील पाच दिवस म्हणजेच रंगपंचमीपर्यंत ही यात्रा भरते. याच मढी यात्रेत गाढवांचा बाजार महत्वाचा असतो.
दरम्यान या बाजारात वेगवगेळ्या जिल्ह्यातील व्यापारी खरेदी विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. पुणे येथील व्यापारी सुनील पवार म्हणाले, तिसगाव वाहतुकीचे दृष्टीने सोयीचे आहे. गर्दीचा त्रास कमी होतो. मढीत जायची गरजच नाही. गावरान व वयस्कर गाढवांना तीन दिवस उलटले तरीही गिऱ्हाईक नसल्याची खंत बाळकृष्ण माने यांनी व्यक्त केली. आंध्र, तेलंगणातील दलालांनी वाढीव दर देत प्रतवारीची गाढवं खरेदी केली,
गाढविणीच्या दुधाला नऊ हजारांचा भाव...
काही ग्राहक तर गाढविणीच्या दुधाची मागणी करीत असल्याचे चित्र नजरेस आले. दहा मिली दूध दोनशे रुपये, तर या दुधाचा प्रतिलिटर दर थेट नऊ हजार रुपये असल्याचे गाढव विक्रेते युवराज गायकवाड यांनी सांगितले.
गुजरातेतून ८० गाढवे
राज्यात जेजुरी, जुन्नर, माळेगाव, सोनारी येथे गाढवांचा बाजार भरतो. मात्र, यापैकी श्रीक्षेत्र मढीचा बाजार सर्वांत मोठा अन् मध्यवर्ती ठिकाण मानले गेले आहे. त्यामुळे गुजरात, कर्नाटक, आंध्र, पंजाब येथून व्यापारी दाखल झाले होते. बाबूभाई गाजीभाई या दोन भावांनी गुजरात येथून ८० गाढवे आणली होती.