Join us

Eid 2024 : ऐन रमजानमध्ये सुकामेवा महागला, कसे आहेत सविस्तर दर?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 2:18 PM

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवाचे भाव वाढले असले तरी ग्राहकांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.

नाशिक : ईदनिमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल असते. दूध, सुका मेवा आणि शेवया यांपासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असल्याने मालेगावच्या बाजारात सुका मेव्याला अधिक पसंती दिली जात आहे. यासाठी बाजारात ग्राहकांकडून काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, चारोळी, खारीक, खजूर, मनुका अन्य सुका मेवा पदार्थांची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव वाढले असले तरी ग्राहकांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.

मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रमजानचा महिनाभर उपवास केला जातो. सूर्यास्तानंतर फळे व सुका मेवा खाऊन सोडला जातो. त्यामुळे या महिन्यात फळे व सुका मेव्याची मोठी खरेदी होते.

याशिवाय शिरखुर्मासाठी काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, चारोळी, मनुका, सुके खजूर, आदी सुका मेवा लागतो. खोबरे, काजू, मनुके व अन्य पदार्थांची महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून आयात- निर्यात केली जाते. दरवर्षी इंधनाच्या दरांत व बाजारभावाच्या किमतींत वाढ होत असल्याने सुका मेव्याच्या किमतींत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कधी व कसा खावा?

सुका मेवा भिजवून ठेवून खाल्ल्याने पचनयंत्रणेला चालना मिळते. पोटातील घातक विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे सुका मेवा खाताना तो नेहमी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते.

असे आहेत दर

अंजीर 800 ते 1200 रुपये किलो, खारीक 160 ते 360 किलो, खोबरे 120 रुपये किलो, काजू 700 ते 1000 रुपये किलो, बदाम 600 ते 1000 रुपये किलो, किसमिस 220 ते 260 रुपये किलो, पिस्ता 960 रुपये 1000 रुपये किलो, मेथी 90 ते 100 रुपये किलो.

टॅग्स :शेतीईद ए मिलादरमजानरमजान ईदनाशिक