Join us

रमजानमुळे केळीच्या आवक वाढली, मात्र निर्यात मंदावली, भाव काय मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 2:36 PM

रमजानमुळे केळीला मागणी वाढली असून बाजारभावात स्थिरता आहे, मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नसल्याचे दिसते आहे.

जळगाव : सध्या  केळीची काढणी सुरु असून मोठ्या प्रमाणात मालाची आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर केळी मालाला चांगला उठाव असून दर्जेदार मालाला १५०० ते १७०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. मात्र इतर सर्वसाधारण मालाला अपेक्षित बाजारभाव नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  तर हे बाजारभाव स्थिर असल्याचे वेंपरि सांगत आहेत. तसेच वाढत्या उन्हाचा फटका केळीच्या गुणवत्तेवर होत असल्याने बाजारभावावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. 

जळगाव जिल्ह्यात मोठया प्रमाणात केळीची लागवड करण्यात येते. मात्र यंदा पीक काढणीला आले असताना बाजारभावामुळे शेतकरी नाराज आहेत. गतवर्षी आंध्र प्रदेश, गुजरात वा सोलापूर भागात केळी मालाची वानवा होती. त्यामुळे खान्देशी केळीने तब्बल तीन हजार रुपये क्विंटल दरापर्यंत मजल मारली होती. त्याउलट यंदा स्थित्यंतरे असल्याने मागील वर्षीच्या दराइतकी चमक नाही. किमान रमजानच्या महिन्यामुळे चांगल्या गुणात्मक दर्जाच्या केळी मालाला १५०० ते १७०० रु. प्रतिक्विंटल, तर सर्वसाधारण केळी मालाला 1 हजार 100 तर 1600 रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. 

दरम्यान बाजारात केळी उपलब्ध असताना रमजानमुळे उठावही चांगला आहे. तर दुसरीकडे तांत्रिक अडचणीमुळे केळी निर्यात रोडावले आहे. यामुळे एका दृष्टीने केळी भावात स्थिरता असल्याचे मानले जात आहे. यात भर म्हणून की काय केळी निर्यातीसाठी कंटेनरच्या भाड्यात तिपटीने वाढ झाली आहे. दोन हजार रुपयांवरून सहा हजार रुपयांपर्यंत भाडे वाढ होऊ नये, दर आठवड्याला दोन तीनवेळा उपलब्ध होणारे कंटेनर आता आपण एकदाच उपलब्ध होत आहे. त्यामुळे केळी निर्यात कमी झाले आहे.

शेतकरी काय म्हणाले? 

रमजानमुळे केळी मालाला चांगला उठाव आहे. त्यामुळे केळी भावात स्थिरता टिकून आहे. दुसरीकडे टरबूज खरबूज बाजारात असताना व केळी मालाची स्थिरता असल्याचं केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी सांगितलं तर केळी उत्पादक शेतकरी डी के महाजन म्हणाले की, गतवर्षी केळी माल नसल्याने आपल्याकडील केळी मालाची चांदी होती. यंदा केळी उपलब्ध असल्याने गुणात्मक दर्जा नुसार भाव आहेत. एप्रिलमध्ये कापणीवर येणाऱ्या केळी मालाची गुणवत्ता अपेक्षा चांगल्या दर्जाची राहण्याची शक्यता आहे. यातून भाव वाढ होण्याची शक्यता आहे.

वाढत्या उन्हापासून काळजी 

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून या वाढत्या तापमानाचा फटका काढणीस तयार केळीला बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बचावासाठी केळीच्याच पानांचा वापर केला आहे. शेतकरी विजय वाणी यांनी आपल्या शेतात सुमारे ८ हजार टिश्यू रोपांची लागवड असून या रोपांची केळीची निसवण सुमारे ९० टक्के झाली आहेत. येत्या पंधरा दिवसांत केळीचा माल निघण्यास सुरुवात होईल. उन्हाळ्यात केळीच्या घडाला गारवा मिळावा, यासाठी केळीच्या पानाचा उपयोग केला जात आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीकेळीमार्केट यार्डजळगाव