देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याचा पारा 42 अंशांवर गेल्याने याचा परिणाम फूल उत्पादनावरही झाला आहे. लग्नसोहळ्यासह धार्मिक कार्यात फुलांना मागणी असते; पण ऐन हंगामामध्ये आवक घटल्याने दरवाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे फुलांचे उत्पादन कमी झाले असून, आवक घटल्याने एरवी 40 -50 रुपयांना मिळणारे हार 90-100 रुपयांना मिळत आहे.
देसाईगंज तालुक्यात प्रामुख्याने धान शेती होत असल्याने फुलशेतीकडे शेतकऱ्यांचे फारसे लक्ष नाही. फुलांसाठी पूर्णपणे नागपूरवर अवलंबून राहावे लागते. दिवाळीत काही प्रमाणात स्थानिक शेतकरी झेंडूची शेती करतात. त्यानंतर मात्र फुलशेती होत नाही. दररोज नागपूरवरून ताजी फुले आणली जातात. दिवसभर या फुलांना ताजे ठेवणे तारेवरची कसरत आहे.
सद्यस्थितीत 80 रुपये किलो मिळणारे झेंडूची फुले आता 200 रुपये किलोवर पोहोचली आहेत, गुलाबही भाव खाऊ लागला आहे. दहा रुपयांचा गुलाब 20 ते 25 रुपयांना विकला जात आहे. हारांच्या किमतीही गगनाला भिडल्या असून 30 रुपयांत मिळणाऱ्या हारासाठी आता 70 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत.
या फुलांना आहे अधिक मागणी
दरम्यान सजावटीसाठी प्रामुख्याने गुलाब, जरबेरा, आर्किड, लिलयम, ग्लॅडिओलस या फुलांचा वापर होतो. ही फुले इतर फुलांच्या मानाने अधिककाळ ताजी राहतात. सध्या लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने फुलाच्या विक्रीचाही हंगाम आहे. मात्र, वाढत्या तापमानाचा फटका फुलशेतीला बसल्याने दर वधारले. नवरदेवाची गाडी सजविण्यासाठी दिवसभर ताजी राहणारी फुले वापरावी लागतात. गुलाब आणि जरबरा या फुलांचा वापर करावा लागतो. मात्र, या कडक उन्हामुळे फुले लगेचच कोमेजून जातात. त्यामुळे कृत्रिम किंवा प्लास्टिकच्या फुलांनी चारचाकी सजवून देण्याकडे भर वाडला आहे.
आजचे फुलांचे दर
आज पुणे बाजार समितीत गुलाबाला क्विंटलमागे 15 हजार रुपयांचा दर मिळाला. मात्र दोन दिवसांपूर्वी याच बाजार समितीत 17 हजार 500 ररुपयांचा दर मिळाला होता. तर पुणे बाजारात चाफ्याच्या एका नगास 12 रुपयांचा दर मिळाला आहे. तर जरबेरास प्रतिनगामागे 25 रुपयांचा दर मिळत आहे. तर झेंडूला क्विंटलमागे 6 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. तर पुणे बाजारात मोगऱ्यास सर्वाधिक 40 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. लिलीला प्रति नगामागे 15 रुपयांचा दर मिळतो आहे.