खरीप हंगामातील कांदा, कापूस व सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने यंदा शेतक-यांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. त्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. त्याचबरोबर रब्बी लागवडीवर देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतमालाला रास्त भाव मिळणे आवश्यक झाले असून यासाठी ठोस उपाययोजना होणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेती पिकावर त्याचा मोठा परिणाम झाला. मात्र या संकटावर शेतकऱ्यांनी मात करत शेती फुलवली. मात्र ऐन विक्रीच्या वेळी बाजारभाव मिळेनासे झाले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मागील चार वर्षांपासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होत असल्याने शेतकरी दुष्टचक्रात अडकल्या जात आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तुर आदी पिकांची लागवड करण्यासाठी महागडी बियाणे रासायनिक खत, औषधी खरेदी करतात, पेरणी करण्यासाठी शेतकरी उसनवारी व कर्ज काढतात, मात्र, कधी नैसर्गिक तर कधी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
मागील दोन वर्षापासून कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च आणि निव्वळ उत्पन्न यात शेतकरी भरडला जात आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात सर्वाधिक ३४ हजार १३५ हेक्टरवर कापूस व सोयाबीनची २२ हजार ९०९ क्षेत्रावर शेतक-यांनी लागवड केली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिल्याने बहारात आलेले सोयाबीन व कापूस या पिकांवर मोठा परिणाम झाला. पावसाच्या खंडाने सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी पाच हजार दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे भाव होता. मात्र, शेतकऱ्यांनी बाजारपेठेत सोयाबीन विक्रीला आणताच हेच भाव गडगडले आणि सोयाबीनला सद्यः स्थितीत चार हजार तीनशे रुपये प्रमाणे भाव मिळत आहे.
शेतकरी आर्थिक संकटात
एकीकडे नैसर्गिक संकटाने सोवाचीनचे उत्पन्न घटले त्यातच समाधानकारक भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, दोन वर्षापूर्वी कापसाला विक्रमी दहा हजार रुपयांचा भाव मिळाला होता. त्यानंतर कापसाचे क्षेत्र देखील वाढले होते. परंतु, यावर्षी कापसाचे दर ७ हजार ७०० रुपये ते सहा हजार नऊशे रुपयेपर्यंत घसरल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. औषधी, खते आणि मशागतीसाठी तसेच कापूस वेचणीसाठी मोठा खर्च येतो, त्या तुलनेत कापसाला अपेक्षित भाव सध्या मिळत नाही. गतवर्षीचा कापूसदेखील काही शेतक-शेतकऱ्यांनी विकलेला नाही. भाव वाढेल, या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, अपेक्षित भाववाढ अद्यापही झालेली नाही. दरम्यान, यंदा शेती मालाचे भाव वाढत नसल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.