- संजय सोनार
जळगाव :कापूस पणन महामंडळातर्फे कापूस खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांसाठीचा मोठा आधार असलेल्या जिनिंग उद्योगानेही साथ सोडली असून शासनाने मदतीचा हात आखडता घेतला आहे. दुसरीकडे शेतीसंबंधित सर्वच रासायनिक खते, पेस्टिसाइड्सचे दर दुप्पटीने वाढले असताना कापसाचे दर सरासरी साडेसात हजारांपेक्षा जास्त सरकतच नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
कापसाचा दर अजूनही साडेसात हजारांच्या पुढे सरकलेला नाही. परिणामी परिसरातील तीस टक्के उत्पादकांनी घरात साठवून ठेवलेला कापूस अद्यापही बाहेर काढलेला नाही. कापसाची निर्यात बंद, पणनतर्फे खरेदी बंद, भाववाढ बंद असे विविध 'बंद' पुकारल्याने कापूस उत्पादक शेतकरी खचला आहे. कापसाची निर्यात बंद असताना दुसरीकडे शासनाने गाठीची आयात मात्र सुरु ठेवली आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. यावर नगरदेवळा विकासो अध्यक्ष शैलेंदसिंग जयाती म्हणाले की, खते, पेस्टिसाइइसच्या किमतीत दुप्पट वाढ केल्याने खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे. सध्या भाव किमान दहा हजाराच्यावर पाहिजे होता. शासनाने निर्यातबंदी केली. मात्र सोबतच गाठी आयात केल्याने शासनाचे हे धोरणच न कळणारे असल्याचे त्यांनी सांगितले
गेल्यावर्षीचा कापूस अद्याप घरात असताना यावर्षीच्या कापसाचीही त्यात भर पडली आहे. १ एकर कापूस क्षेत्रासाठी तब्बल २५ हजार एवढा खर्च येतो, तर उत्पादन अवघे ६-७ क्विंटल येते. त्यामुळे कापसाची शेती परवडणार कशी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे एका जिनिंगला एका दिवसात किमान १० हजार क्विंटल कापसाची गरज असते. मात्र शेतकरी भाववाढीच्या आशेने ठेवलेला कापूस घरातून काढतच नाही. सोबतच मोठ्या पगाराचे कर्मचारी, हातमजूर, हमाल-मापाडी, वीजबिल व करोडो रुपयाच्या उद्योगावरील बँकेचे व्याज आदी एक ना अनेक खर्चिक बाबी सांभाळण्यास जड जात असल्याने तालुक्यातील १७ पैकी फक्त तीनच जिनिंग सुरू आहेत. त्यात नगरदेवळा परिसरातील चारपैकी दोनच उद्योग जेमतेम सुरू आहेत.
किरकोळ खरेदीदार हे पाणी मारून व अनेक तोलांवर कापूस खरेदी करतात तर जिनिंग उद्योजक हे शुष्क, एकतोली व प्रतवारी पाहून खरेदी करतात. एका जिनिंगला दररोज किमान १० हजार क्विंटल कापूस लागतो. मात्र शेतकरी घरातून कापूसच बाहेर काढत नसल्याने जिनिंग व्यवसाय बंद आहे. निर्यातही बंद असल्याने कापसाचे दर स्थिर आहे. वाढीव दराने कापूस खरेदी केली तरी गाठी खरेदीदारच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
-दिनेश अमृतकर, जिनिंग उद्योजक, नगरदेवळा
आजचे कापसाचे बाजारभाव
दरम्यान आज सकाळ सत्रातील कापसाचे बाजार भाव पाहिले असता घाटंजी या बाजार समितीत एलआरए मध्यम स्टेपलच्या कापसाला सरासरी 07 हजार 300 रुपये दर मिळाला. देऊळगाव राजा बाजार समितीत लोकल कापसाला 07 हजार 600 रुपये दर मिळाला. वर्धा बाजार समिती मध्यम स्टेपल कापसाला क्विंटल मागे सरासरी 07 हजार 50 रुपये दर मिळाला. भिवापूर बाजार समितीमध्ये वरलक्ष्मी मध्यम स्टेपल कापसाला सरासरी 7 हजार 140 रुपये दर मिळाला. तर कळमेश्वर बाजार समितीत हायब्रीड कापसाला सरासरी क्विंटलमागे 06 हजार 800 रुपये दर मिळाला.