Join us

Mango Season : नाशिकच्या ग्रामीण भागातील आंबा सातासमुद्रापार, दशेहरी अन् केसरचा बोलबाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:32 PM

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) फळपिकाचा विचार केला तर गतवर्षी द्राक्षनिर्मितीनंतर (Grape Farming) सर्वाधिक लागवड आंबा पिकाची झाली होती.

नाशिक : द्राक्षनिर्मितीतून नाशिक जिल्ह्याचे (Nashik District) नाव सातासमुद्रापार पोहोचले असून, त्यानंतर आता आंबा उत्पादनातून जिल्ह्यात कृषिक्रांती घडली आहे. फळपिकाचा विचार केला तर गतवर्षी द्राक्षनिर्मितीनंतर सर्वाधिक लागवड आंबा पिकाची (Mango Cultivation) झाली होती. त्यामुळे संकटांचा सामना करणारे शेतकरी या दोन मुख्य पिकांनी मालामाल झाले आहेत.

द्राक्षांची (Grape Farming) एक लाख ५६ हजार टन निर्यात युरोप, आफ्रिका खंडासह आशिया देशामध्ये झाली. तर आंब्याचे लागवड क्षेत्रही ३५०० हेक्टरपर्यंत पोहोचले. त्यामुळे नाशिकचाआंबाही यंदा बाजारात दिसतोय. नाशिकच्या दशेहरी अन् केसर आंब्याने बाजारावर यंदा आपली पकड घट्ट केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हापूस आंब्याचे देखील पीक घेऊन पाहिले, मात्र या पिकाला कोकणसारखे प्रतिकूल हवामान नसल्याने शेतकरी केसर अन् दशेहरी आंब्याकडेच वळले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यास शंभर टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची, वृक्षांची, फूलपिकाची, मसाल्याची लागवड करता येते. या योजनेमुळेच जिल्ह्यात आंबा पिकाचे लागवड क्षेत्र वाढल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा (Surgana), सिन्नर, दिंडोरी (Dindori) या भागात आंब्याची सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आंबा पिकासाठी पोषक वातावरण असून, जवळपास १५० बागा अशा आहेत की त्यात ४०० हून अधिक आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्यात दरवर्षी भर पडत असल्याने नाशिक जिल्हा सहा ते सात वर्षांत आंबा पिकात अजूनच समृद्ध होईल. जिल्ह्यात २०२२ ला २०६४ हेक्टरवर १ लाख ६० हजार आंब्याची लागवड झाली होती. २०२३ ला लागवड क्षेत्र वाढून ते ३५०० हेक्टरपर्यंत गेले. गावंडे यांनी आदिवासी बचत गट गव्हाणपाडा या संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून आंबा लागवडीसाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे पेठ, सुरगाणा भागात आंब्याच्या शेकडो बागा आज नजरेस पडत आहेत.

आदिवासी पट्ट्यातील केसर अमेरिकेत

नाशिकच्या आदिवासी शेतकऱ्यांनीआंबा लागवडीत क्रांती घडवून आणली आहे, उत्पादकता वाढवली आहे, तर सेंद्रिय प्रमाणीकरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रवेशामुळे केसर जातीची यूएसला यशस्वी निर्यात झाली आहे. असेच एक शेत पेठच्या दुर्गम भागातील ६२ वर्षीय शेतकरी यशवंत गावंडे यांचे आहे. पारंपरिक शेती पद्धतीपासून जरा दूर जात त्यांनी आंबा लागवडीत क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला.

मी स्वतः माझ्या शेतात आंब्याची ४०० झाडे लावली असून, त्यात केशर व दशेहरी आंब्याचा समावेश आहे. झाडे लहान होती, तेव्हा त्यात सोयाबीनचे आंतरपिक घेतले होते. तीन वर्षांपासून आंब्यापासून उत्पन्न घेत आहे. माझी सहा एकर शेती असून, यंदा हवामान खराब असल्याने २२ ते २५ किलो आंबा मावेल असे ३० क्रेट आंबे निघाले. वर्षातून तीन वेळा आंब्याच्या झाडाला फवारणी करावी लागते. तसेच ठिबकद्वारे पाणी देतो.- देवराम महाजन, खडकी, ता. कळवण

लागवडीसोबत आंबाप्रक्रिया केंद्रहीनाशिक जिल्ह्यात आंब्याचे लागवड क्षेत्र तर वाढतच आहे. परंतु बाहेरून आलेल्या आंब्यावर प्रक्रियाही केली जात आहे. यावर्षीच्या आंब्याच्या हंगामात, नाशिकमधील लासलगाव ईरॅडिएशन प्लांटमधून सुमारे एक हजार मेट्रिक टन आंबा यूएस किनाऱ्यावर पोहोचला. महाराष्ट्रातील दोन विकिरण केंद्र, ज्यात खासगी संस्था चालवल्या जाणाऱ्या लासलगाव सुविधेचा समावेश आहे. निर्यात केलेल्या वाणांमध्ये अल्फोन्सो आणि केसरसारख्या लोकप्रिय प्रकारांचा समावेश होतो, ज्यांची लासलगाव केंद्रात प्रक्रिया केली जाते आणि ती थेट मुंबईमार्गे अमेरिकेत पाठवली जातात. लासलगाव इरॅडिएशन प्लांटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची निर्यात तिपटीने वाढली आहे, जे व्यापारात चांगली सुधारणा दर्शवते. 

टॅग्स :आंबाशेतीशेती क्षेत्रनाशिक