नाशिक : रशिया-युक्रेन युद्धामुळे समुद्रामार्गे द्राक्ष नेण्यासाठी कंटेनरचा १२ दिवस वाढलेला प्रवास व त्यामुळे कंटेनरची झालेली भाडेवाढ सोबतच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा बसलेला फटका यामुळे द्राक्ष निर्यात यंदा संकटात सापडली होती. त्यामुळे हंगाम यंदा एक महिना अगोदरच संपत असला तरी द्राक्ष निर्यातीने यंदाचे आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात विदेशात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक संकटे अंगावर घेऊनही द्राक्ष उत्पादकांनी यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेने २२ हजार क्विंटल द्राक्ष अधिक प्रमाणात सातासमुद्रापार पाठवले आहेत.
बांगलादेशला मोठ्या प्रमाणात जाणारे द्राक्ष भरमसाट आयात शुल्क दुष्काळात तेरावा महिना ठरत आहेत. थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षाला अपेक्षित मागणी जानेवारीत नव्हती त्यामुळे नीच्चांकी दराने द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली होती. फेब्रुवारीत दरात वाढ झाली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, उगाव, निफाड, वडनेर भैरव, चांदवड आदी भागांतून दररोज २०० ट्रकमधून ५०० टन द्राक्ष परराज्यात गेली. स्थानिक बाजारपेठेसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे यंदा देखील द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणात झाली.
युरोप खंडातही माल जाऊ लागला. दरात देखील गोडवा आल्याने द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला. स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांना किलो मागे १० ते १५ रुपयांची तेजी आली होती. नाशिक जिल्ह्यातून रोज १५ ते १७ हजार टन द्राक्ष परराज्यात गेले. जिल्ह्यात पावणेदोन लाख हेक्टरवर निफाड, दिंडोरी, नाशिकसह परिसरात द्राक्षांच्या बागा फुलल्या होत्या, सुमारे १२ लाख टन द्राक्षांचे उत्पादन हंगामात होते. प्रारंभी २० ते २५ रुपये किलोने व्यापा-यांनी द्राक्षांचे सौदे केले.
कंटेनरचा साऊथ आफ्रिकामार्गे युरोप प्रवास
निर्यातक्षम दाक्षाला दिवाळीत १२ हजार ७०० रुपयांचा दर क्विंटलमागे होता. जानेवारीत पहिला कंटेनर रशियास रवाना झाला होता. तेव्हा थॉमसन जातीच्या वाणाला १२७ रुपये किलो दराचा दर मिळाला होता. तेव्हापासून यासह इतर वाणांना देखील चांगला दर मिळाला. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे शेतकऱ्यांना विदेशात द्राक्षमाल नेण्यासाठी दुप्पट खर्च करावा लागला. सुवेझ कालव्यामार्गे माल युरोपात पोहोचत होता. युद्धामुळे मुंबईच्या बंदरातून साउथ अफ्रिकामार्गे कंटेनर युरोप खंड व इतर देशात जाऊ लागले. त्यामुळे कंटेनरचा १२ दिवसांचा प्रवास वाढला अन् भाडेही वाढले. एका कंटेनरला युद्धापूर्वी २५०० रुपये लागायचे तेच भाडे नंतर ४५०० रुपये झाले. मात्र, असे असताना द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट टप्पा पार झाले आहे.
रमजानमुळे मागणी वाढली
वाढते तापमान, सुरू असलेला रमजान महिना, आगामी सण, उत्सवांमुळे परराज्यात दाक्षांचा उठाव वाढला आहे. बांगलादेशला दाक्ष निर्यात होऊ लागल्याने दरात तेजी येण्यासाठी पूरक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे थॉमसन, सोनाका वाणाचे दर प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांनी व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे.
या देशांमध्ये द्राक्षांची अशी झाली निर्यात
नॉन युरोपमध्ये रशिया, चीन, यूएई, मलेशिया, बांगलादेश या ठिकाणी ३५ हजार ७२२ मेट्रिक टन द्राक्ष २३३२ कंटेनरद्वारे समुद्रमार्गे रवाना झाली. तर युरोपातील नेदरलॅण्ड, हॉलंड, जर्मनी, बेल्झियम, डेन्मार्क आदी देशांत १ लाख १३ हजार ९९९ मेट्रिक टन द्राक्ष ८४५६ कंटेनरद्वारा रवाना झाली. मागील - वर्षी १ लाख २८ हजार १७८ मेट्रिक टन, तर यावर्षी १ लाख ४९ हजार ७२१ क्विंटल द्राक्ष विविध देशांत गेले. यावर्षीचा आकडा वाढला आहे.