Join us

अपेडाद्वारे केळीची विदेशवारी, समुद्रमार्गे रशियाला वीस टन केळीची निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 6:42 PM

अपेडाच्या माध्यमातून भारतातून परदेशात समुद्रमार्गे केळी निर्यात करता येणार आहेत.

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून अपेडा मार्फत आता समुद्रामार्गे केळीची निर्यात शक्य झाली आहे. अपेडाच्या माध्यमातून भारतातून रशियाला समुद्रमार्गे केळी निर्यात करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजेच पहिल्याच वेळी जवळपास 20 मेट्रिक टन इतकी केळीची निर्यात करण्यात यश आले आहे. त्यामुळे साहजिकच केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

केळी हे भारतातील एक प्रमुख बागायती उत्पादन असून आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात मोठे केळी उत्पादक राज्य आहे. केळी उत्पादनात त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताच्या केळी उत्पादनात या पाच राज्यांचा एकत्रितपणे 67 टक्के वाटा आहे. केळीचा सर्वात मोठा जागतिक उत्पादक असूनही, भारताकडून सरासरी निर्यात कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जरी जगातील केळी उत्पादनापैकी 26.45 टक्के (35.36 दशलक्ष मेट्रिक टन) भारतात होते, तरीही जागतिक बाजारपेठेत भारताच्या निर्यातीचा वाटा केवळ 1 टक्के आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताने 176 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची केळी निर्यात केली आहे. 

दरम्यान (अपेडा) उप उष्ण कटिबंधीय फलोत्पादन केंद्रीय संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशन प्रा. लि. ही मुंबईमधील फळे आणि भाजीपाल्याची निर्यातदार असलेल्या कंपनीच्या माध्यमातून 17 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातून 20 मेट्रिक टन (1540 बॉक्स) केळीची खेप अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. ही कंपनी युरोपियन युनियन आणि मध्य पूर्वेकडील देशांना नियमितपणे ताजी फळे आणि भाज्यांची निर्यात करत असते. याच दृष्टीकोनातून अपेडाने समुद्रमार्गे वाहतूक करण्याचा निर्णय घेत केळी पिकाच्या निर्यातीतून हा निर्णय अमलात आणला आहे. 

केळीची निर्यात वाढणार 

अलीकडेच, रशियाने भारताकडून उष्णकटिबंधीय फळांच्या खरेदीमध्ये उत्सुकता दर्शविली असून केळी हे त्यातीलच एक फळ आहे. केळी ही रशियाची एक प्रमुख कृषी आयात असून सध्या रशियात प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर येथून केळी आयात केली जात होती. भारतीय केळीच्या प्रमुख निर्यात स्थळांमध्ये इराण, इराक, संयुक्त अरब अमिरात, ओमान, उझबेकिस्तान, सौदी अरेबिया, नेपाळ, कतार, कुवेत, बहारीन, अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, चीन, नेदरलँड्स, ब्रिटन आणि फ्रान्स हे देश देखील भारताला निर्यातीच्या मुबलक संधी उपलब्ध देत असल्याने इथंही निर्यात करण्याचा विचार केला जात आहे. 

अधिकाधिक निर्यातदारांना प्रोत्साहन 

अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव म्हणाले की, सद्यस्थितीत अपेडा अधिकाधिक निर्यातदारांनी नवीन उत्पादने नवीन ठिकाणी पाठवण्यासाठी नवीन पद्धती वापरण्याच्या प्रयत्नांना सुलभ बनवत आहे. शिवाय या निर्यातदारांना संपूर्ण पाठिंबा देऊन प्रोत्साहित करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महिला नवउद्योजकांना पाठिंबा देण्यावर विशेष भर देत असलेल्या अपेडाच्या आर्थिक सहाय्य योजनेवर देव यांनी प्रकाश टाकला. पुढील पाच वर्षांत भारतातून केळी निर्यातीचे 1 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठणे अपेक्षित आहे. या यशामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि 25 हजार हून अधिक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल. तसेच पुरवठा साखळीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या 50 हजारहून अधिक समुहांसाठी रोजगार निर्माण होईल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीकांदाकेळीमार्केट यार्ड