नाशिक : देशभरातून कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी मागणी होत असताना अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत कांदा निर्यात बंदी, तोपर्यंत बाजार बंदी अशी भूमिका घेत बाजारात कांदा न आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांदा लिलाव ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे कांदा दर देखील घसरले आहेत. यामुळे अनेक शेतकरी संतप्त आहेत. आता आंदोलनाचा पवित्र घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनासाठी आता शेतकरी गावागावांत जाऊन जनजागृती करणार आहेत. निर्यातबंदीवरून कांद्याच्या राज्यभरातील शेतकरी एकवटले असून, त्यांनी बाजार बंदीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बैठकीत जोपर्यंत कांदा निर्यात बंदी, तोपर्यंत बाजार बंदी अशी भूमिका घेतली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
येत्या तारखेपासून बाजारात कांदा घेऊन न जाण्याचा निर्णय घेताना राज्यभरात यासाठीची जनजागृती करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. हिवाळी अधिवेशन झाले तरीही कुणी कांद्याच्या प्रश्नावर बोलले नाही, त्यावर तोडगा काढण्याची निव्वळ आश्वासने देण्यात आली. मात्र अद्यापही त्यावर तोडगा काढण्यात आला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यावर आणि मंत्र्यावर भरवसा कसा ठेवायचा, असा संतप्त सवाल केला.
अशा आहेत मागण्या
शेतमालावरील निर्यातबंदी उठविण्यात यावी, कांदा, कापूस, कडधान्य, मका, द्राक्ष ऊस यावरी निर्णय मागे घ्यावी.कापसाची रास्त भावाने खरेदी करावी.दुधाला 3.5 फॅट 40 रुपये याप्रमाणे दर मिळावा, सरकारी संघाला दिलेले 5 रूपये अनुदान शासनाने महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पादकांना मिळावे.रासायनिक खतासाठी लागणारा जीएसटी बंद करावा.दिवसा शेतीला पुर्ण दाबाने वीज मिळावी, स्मार्ट मीटर बंदी करावी.संपूर्ण शेतीवरील कर्ज मुक्त्त करण्यात यावीत.महाराष्ट्र राज्य दुष्काळी जाहिर करावा.कृषी कर्जासाठी सिबील स्कोरची अट रद्द करावी.