नाशिक : यंदा ऑक्टोबरमधील पावसाने शेतीच अतोनात (Crop Damage) नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील फुलशेतीवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणात आवक घटण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम बाजारभावावर होण्याची शक्यता फुलविक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. आजच्या घडीला मोगरा ७०० रुपये किलोवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत दर वाढण्याची चिन्हे आहेत.
नाशिक जिल्ह्यात ३५० ते ४०० एकरवर फुलशेती (Flowers Farming) केली जाते. यात गुलाब, झेंडू या फुलांची शेती सर्वाधिक होत असते. मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे फुलशेतीवर संकट कोसळले आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांना चांगले मार्केट मिळण्याची शक्यता आहे. झेंडू, मोगरा यांसारख्या फुलांचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढले असून सद्यस्थितीत मागणी वाढली आणि फुलांची आवक कमी झाली.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांचे दर वाढले (Flowers Market) आहेत. दिवाळीतील पूजेसाठी झेंडूच्या माळा, पूजेला लागणारी फुले, दुर्वा यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. फुलांचे दर वाढले असले तरी फूलबाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. फुलांची आवक कमी झाल्याने दर वधारले आहेत. अखेरच्या टप्प्यात फुलबाजार तेजीत येईल अशी अपेक्षा आहे. - तेजस ताजनपुरे, फुल विक्रेता
कसे आहेत फुलांचे दर
मोगरा 700 रुपये किलो, निशिगंधा 240 रुपये किलो, झेंडू 200 रुपये किलो, पिवळ्या आणि केशरी झेंडू फुलांची माळ 20 ते 200 रुपये, गुलाब तीस रुपये जोडी असा किरकोळ बाजारातील दर आहेत. तर बाजार समिती मधील दर पाहिले असता पुणे बाजारात लोकल गुलाबाचा एक नग 15 रुपये तर नंबर एकच्या गुलाबाच्या नगास 85 रुपये दर आहेत. तर शेवंतीचा एक नग 125 रुपयांना मिळत आहे.