छत्रपती संभाजीनगर :फळे व भाजीपाल्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी पणन मंडळाच्या माध्यमातून हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मॅगनेट प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन महासंघाने एशियन बँकेच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात हे सुविधा केंद्र आहे. आता या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जूनपासून हे केंद्र खुले होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात विशेषतः पाचोड परिसरात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड होते. या पार्श्वभूमीवर मोसंबी निर्यात सुविधा केंद्र पाचोड येथे असावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीची दखल घेत शासनामार्फत सुमारे दोन वर्षांपूर्वी पाचोड येथील उपबाजार समितीच्या आवारात दोन एकरवर फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. फळे व भाजीपाला सुविधा हाताळणी केंद्रामुळे काढणी पश्चात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान कमी करणे व त्याची साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मुल्यवृध्दी करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी होणार आहे.
दरम्यान फळ व भाजीपाला निर्यातीमध्ये राज्याचा वाटा मोठा आहे. म्ह्णूनच आगामी काळात या सुविधा केंद्रामुळे निर्यातक्षमता वाढेल, शेतकऱ्यांचा विश्वासही वाढेल तसेच जागतिक बाजारपेठेत चांगला व दर्जेदार फळे व भाजीपाला निर्यात होण्यास मदत होणार आहे. यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँक आणि राज्य शासनाच्या महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने (मॅगनेट) प्रकल्पांसाठी १३ कोटी २४ लाख ४० हजार रुपये निधी उपलब्ध केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे असून, जूनपासून है। केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पणन महासंघाचे अरूण नागरे पाटील यांनी दिली.
कोणत्या सुविधा उपलब्ध?
ग्रेडिंग सेंटर - मोसंबीची विगतवारी करण्यासाठी ग्रेडिंग लाइनवर प्रति तास १५ मेट्रिक टन क्षमता.
प्री कुलिंग - शेतमालाचे तापमान करण्यासाठी ६ मेट्रिक टन प्रति बेंच सुविधा (सहा तास प्रति बॅच)
कोल्ड स्टोअरेज - शेतमाल काही दिवस टिकवून ठेवण्यासाठी २५ मेट्रिक टनाचे ४ चैंबर एकूण क्षमता १०० मेट्रिक टन.
पॅक हाऊस - शेतमालाचे ग्रेडिंग आणि पॅकिंग करण्यासाठी ८ हजार ८२३ चौरस फुटाचा हॉल.
यंत्र सामग्री आणि अन्य आवश्यक सुविधा - ६० मेट्रिक टन क्षमतेचा भुईकाटा, कार्यालय, स्टोअर, संरक्षक भित असलेली आधुनिक सुविधा..