Join us

लसूण कडाडला! दर किती रुपयांनी वाढले, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:23 PM

एकीकडे अनेक पिकांचे बाजारभाव घसरत असताना लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून लसणाचे दर सातत्याने वाढत आहेत. पंधरा ते वीस दिवसांमध्येच लसणाचे दर दुपटीने वाढले आहेत. वाशिममध्ये लसूण ४०० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. एकीकडे अनेक पिकांचे बाजारभाव घसरत असताना लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. 

वाशिम बाजारपेठेत सध्या मध्यप्रदेशातून लसणाची आवक होत आहे. आवक अत्यंत कमी होत असल्याने जागेवरूनच लसूण महाग मिळत असल्याने किरकोळ बाजारातदेखील लसणाचे दर सातत्याने वाढत आहेत. वीस दिवसांपूर्वी २०० रुपये किलोने मिळणारा लसूण आता ४०० रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. ओला लसूणदेखील ३२० ते ३६० रुपये किलोने मिळत आहे, तर वाळलेला लसूण चांगलाच भाव खात असून, मुख्य भाजीमंडईत ४०० रुपये प्रतिकिलोने वाळलेला लसूण विक्री होत आहे. सद्यस्थितीत पुणे बाजार समितीत लसणाची 644 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 16 हजार तर सरासरी 25500 इतका भाव मिळाला. 

कांदा दरात घसरण सुरूच 

मध्यतरी काद्यांचे दर कमालीचे वाढले होते. त्यात आता सातत्याने घसरण होत आहे. सध्या कांदा शंभर रुपयांत ५ ते ६ किलो मिळत आहे. भाजीमंडईत मात्र कांदा शंभर रुपयांत ४ किलो विक्री केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम येथील भाजीविक्रेते असलेले सागर आरु म्हणाले की, लसणाची आवक अत्यंत कमी झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढले आहेत. परिणामी किरकोळ बाजारातही लसणाचे विक्रमी दर वाढले आहेत. ओला, वाळला, लहान, मोठा अशा प्रकारच्या लसणाला वेगवेगळा दर मिळत आहे. पुढील काही दिवस लसणाचे दर वाढतेच असणार आहेत.

लसूणाचे दर उच्चांकी पातळीवर

मागील वर्षी लसणाचे अधिक उत्पादन झाल्याने लसणाचे भाव घसरले होते. ४० ते ५० रुपये किलोने लसूण विकला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसणाकडे पाठ फिरवली. पाऊस कमी झाल्याने लसणाचे लागवड क्षेत्रही घटले आहे. सध्या वाशिमात मध्यप्रदेशातून लसणाची आवक होत आहे, तेथून होणारी आवक कमी असल्याने परिणामी, लसूण ४०० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे. लसणाचे वाढलेले दर ही उच्चांकी पातळीवर पोहचले असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डवाशिमकांदा