मुखरू बागडे
रोजच्या जेवणातील लाल तिखट आता अधिकव भाव खात असल्याचे दिसते आहे. दरवर्षी लाल मिरची आपला तिखटपणा वाढवित आहे. गतवर्षाच्या दरापेक्षा या वर्षाला प्रतिकिलो ५० रुपयांची भरारी दिसत आहे. संकरित लाल मिरची १५०- २०० रूपये किलोपर्यंत तर गावरान बोट ३०० रुपयांच्या ही पुढे भाव जात आहे.
चुलबंद खोऱ्यात सर्वच पिके उत्पादित केली जातात. बागायतदार आपल्या सोयीने आर्थिक उत्पन्न देणारी पिके निवडतो. अशाच पसंतीच्या पिकांपैकी शेतकरी मिरची उत्पादित करतात. पालांदूर, वाकल, मन्टेगाव ढिवरखेडा, पाथरी, खोलमारा, खराशी आदी गावात गावरान बोट मिल्ची पारंपरिकतेच्या आधाराने घरच्याध बियाणाचा आधार घेत पिकविली जात आहे. गावरान मिरची सारखीच सुधारित जातीची मिरची बाजारात येते, मात्र तिला ग्राहक पसंती देत नाही.
गावरान बोटला अधिक पसंती...
भंडारा जिल्हयात गाव खेड्यातील चुलबंद खोऱ्यात गावरान बोट मिरचीलाच खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. संकरित मिरचीच्या दुप्पट दर असले तरी खवय्ये हटकून गावरान बोट मिरचीचीच खरेदी करतात. एप्रिल महिन्यापर्यंत गावरान बोट मिरचीच्या खरेदी विक्रीची उलाढाल मोठी असते. शेतकयांच्या दारात गावरान बोट मिरचीची आवक सुरू झाली आहे. जवळच्या आंध्र व तामिळनाडू राज्यातून संकरित मिरचीच्या विविध जातींची आयात महाराष्ट्रात सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातसुद्धा मिरचीचा बाजार आंध्र व तामिळनाडूच्या बाजारपेठेवर अवलंबून आहे.
पालांदूरच्या मातीत संकरित मिरची
पालांदूर येथील बागायतदार अरुण पडोळे यांच्या दोन एकरातील बागेत संकरित मिरचीचे उत्पन्न नजरेत भरणारे आहे. दर असला तर हिरवी तोडायची व नसला तर लाल करण्यासाठी ठेवली जाते. नियमाने दरवर्षी मिरचीचे उत्पन्न घेत आहे. ही संकरित मिरची भडकलाल व तेज आहे. या मिरचीला मोठा ग्राहक वर्ग आहे. तर मिरची उत्पादक शेतकरी सुखराम मेश्राम म्हणाले की येत्या दहा दिवसात शेतातील बोट मिरची विक्रीकरिता तयार होईल, वातावरणातील बदलामुळे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे दरवर्षी बोट मिरचीचे दर वाढत आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने बोट मिरचीला किमान ३०० रुपयांचा दर अपेक्षित आहे.