जळगाव : रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी दिली आहे. जिल्हा टिंग फेडरेशनने जिल्ह्यातील १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश दिले आहेत. शासनाने ज्वारीसाठी ३ हजार १८० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. त्यामुळे मालदांडी, शाळू ज्वारीला काही बाजार समित्यांमध्ये मिळणारा भाव वगळता इतर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
खरीप आणि रब्बी हंगामात शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव बाजारात मिळत असल्याने यंदा तूर, हरभरा, मका अशा कोणत्याच धान्याची खरेदी किंवा साधी नोंदणी झालेली नाही. ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करीत होते. अखेर शासनाने ८ मे रोजी ज्वारी खरेदीचे आदेश दिले आहेत. शासनाने ज्वारीसाठी ३ हजार १८० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. बाजारात ज्वारी 2100 ते 2600 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे. मका आणि हरभरा यांना बाजारभावापेक्षा कमी हमीभाव असल्याने वर्षभरात शासकीय खरेदीच झाली नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, एरंडोल, जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव येथील शेतकरी सहकारी संघांना, तर बोदवड सहकारी पर्चेस अँड सेल्स युनियन, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संस्था, फ्रुटसेल सोसायटी पाळधी, शेंदुर्णी सहकारी जिनिंग व प्रेसिंग, कोरपावली वि.का. सोसायटी, यावल या केंद्रांना जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी ज्वारी खरेदी नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्वारी खरेदीसाठी शनिवार सकाळी १० वाजेपासून ३१ मेपर्यंत नोंदणी सुरू राहील. आधार कार्ड, बैंक खाते क्रमांक, पीकपेरा लावलेला सातबारा उतारा यासह शेतकऱ्याचा फोटो घ्यावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.
- संजय पाटील, व्यवस्थापक, शेतकरी सहकारी संघ, अमळनेर.
यापूर्वीच मंजुरी मिळाली असती तर..
शासनाने ज्वारी खरेदीसाठी 3 यापूर्वीच मंजुरी दिली असती तर उर्वरित शेतकऱ्यांवरही कमी भावाने विकण्याची वेळ आली नसती, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना कमी दरात ज्वारी विकावी लागल्याने प्रति क्विंटल हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे ज्वारी बाजारात विकून टाकली. त्यामुळे या ज्वारी खरेदी केंद्राचा लाभ कमी शेतकऱ्यांना होणार आहे.