नाशिक : गेली तीन-चार वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Farmer) मेटाकुटीला आला असून कर्जबाजारी झाला आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष तयार करून युरोप, रशिया, बांगलादेश या देशांत द्राक्षाची परदेशवारी चालू आहे. तालुक्यातील पुरणगाव या गावातील तरुण शेतकऱ्याने मात्र संकटावर मात करत आपली द्राक्ष युरोपला (Grape Export Europe) पाठवले आहे.
सध्या त्यांच्या निर्यातक्षम द्राक्षाला (Grape Market) ८० रुपयांचा दर मिळत असून, त्यांची द्राक्षे युरोपला रवाना झाली आहे. पुरणगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर व प्रमोद ठोंबरे या भावंडांनी २९ सप्टेंबर रोजी आपल्या द्राक्ष बागेची फळ छाटणी करून निसर्गाशी दोन हात करून द्राक्ष पीक सुस्थितीत काढणीला आणले आहेत.
पुरणगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर व प्रमोद ठोंबरे या भावंडांनी कंबर कसली आणि आपले द्राक्षवेलींची २९ सप्टेंबर रोजी आर्ली छाटणी केली. जास्त दिवस चालणान्या निसर्गाशी दोन हात करत "आता रडायचं नाही, आता लढायचे" या बोधवाक्याप्रमाणे औषधांची वेळोवेळी फवारणी करून द्राक्षबाग चांगली पिकवायची, हा उद्देश ठेवून काम सुरु केले. आणि बघता बघता द्राक्षबागेसाठी केलेली मेहनत फळाला आली.
निर्यातक्षम द्राक्षाला मागणी
सध्या निर्यातक्षम द्राक्षला मागणी चांगली असून चांगल्या प्रकारे निर्यात सुरू आहे. स्थानिक बाजारात मात्र व्यापाऱ्यांना द्राक्षाचा तुटवडा आहे. द्राक्षाला ४० ते ५० भासत रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने द्राक्षाला मागणी वाढत असून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात घट आलेली असून पुढील काही दिवसात द्राक्षांचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
द्राक्षेबागेची अर्ली छाटणी हा मोठा जुगारच समजला जातो. जास्त शेतकरी आर्ली छाटणीचे धाडस करत नाही. फायद्यापेक्षा तोट्याची शक्यता जास्त असते. संपूर्ण निसर्गाशी सामना करावा लागतो. औषधांचा खर्चही जास्त असतो. यावर मात करत निसर्गाशी सामना करत द्राक्षबागेतून चांगले उत्पादन मिळाले.
- ज्ञानेश्वर ठोंबरे, उत्पादक, पुरणगाव