नाशिक : अविट रसाळ गोडीमुळे जगप्रसिद्ध असणाऱ्या द्राक्षांच्या पंढरीत म्हणजे नाशिक जिल्ह्यात यंदा अनेक अडचणींना सामना करावा लागला. युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. त्या युद्धाचा परिणाम द्राक्षांच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. दुसरीकडे बांगलादेशने लावलेल्या निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांना खिशाला झळ बसली. त्यावेळी भारत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला असता, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरवर्षी रशिया, युक्रेन तसेच युरोपीय देशात 24 ते 25 हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात केली जातात, पण रशिया आणि युक्रेन मधल्या युद्धामुळे ही निर्यात 14 ते 15 हजार मेट्रिक टन इतकी कमी झाली आहे. येथील वाहतूक बदलून आफ्रिका खंडाला वळसा घालून सुरू करण्यात आली, मात्र त्यात 12 ते 15 दिवसांचा कालावधी वाढला असल्याने खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे, मात्र तो खर्च आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे माथी मारल्याचं दिसून येत आहे. तरीही भारत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कोणत्याही निर्णय घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. द्राक्ष उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारात आपली द्राक्ष पाठवतो, पण त्याला योग्य मोबदला मिळत नाही.
निफाड भागात जवळपास 25 हजार हेक्टर द्राक्ष बाग आहेत. कॅलिफोर्निया म्हणून ओळख देखील निफाडच्या द्राक्ष पंढरीची आहे, मात्र ही ओळख हळूहळू पुसली जाते की काय असं वाटू लागलं आहे. केंद्र शासनाच्या हस्तक्षेप अटीशर्ती यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात द्राक्ष मालाला करत असल्याने द्राक्ष शेती संकटात सापडले आहे. आता यापुढे शासनाने शेतकऱ्यांना मागेल त्याला आच्छादन द्यावे, त्यासाठी अनुदान योजना राबवण्याची मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीसाठी हस्तक्षेप करावा, अशी ही मागणी जोर धरू लागली आहे.
तर द्राक्षाला भाव मिळाला असता...!
बांगलादेशाने मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी करूनही भारताने पुरवण्यास नकार दिला आणि त्यामुळे बांगलादेशने देखील इतर पिकांवर निर्यात शुल्क वाढवले, ते जवळपास प्रतिक्विंटल 35 वरून 120 रुपयांपर्यंत केले. ज्या द्राक्ष टोमॅटो या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भारताने बांगलादेश ला कांदा निर्यात केली असती तर द्राक्षला देखील मोठा बाजारभाव मिळाला असता, असे सांगितले जात आहे.
बांगलादेशने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी रंगीत द्राक्षाला १०६ रुपये निर्यात शुल्क आणि सर्वसाधारण द्राक्षाला शंभर रुपये निर्यात शुल्क आकारले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सगळे पैसे निर्यात शुल्कात जाऊ लागले, याचा फटका व्यापाऱ्यांना न बसता थेट शेतकऱ्यांना बसला. आता सद्यस्थितीत मार्केट वाढले आहे, मात्र त्या तुलनेत द्राक्ष माल संपुष्ठात आला आहे. केवळ पंधरा ते वीस टक्के माल शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. शिवाय याआधी मार्चमध्ये रेट अधिक असायचे, मात्र यंदा फेब्रुवारीमध्ये अशी परिस्थिती झाली, मात्र त्यावेळी इस्रायल हमास युद्ध, इकडे बांगलादेशने लावलेली ड्युटी यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
- कैलास भोसले, महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक शेतकरी संघटना, उपाध्यक्ष