नाशिक :द्राक्ष उत्पादनासाठी (Grape Farming) नाशिक जिल्हा देशात अग्रगण्य आहेत. जिल्ह्यातील द्राक्ष देश आणि विदेशात प्रसिद्ध आहेत. द्राक्ष आणि त्यापासून तयार केलेले बेदाणे यांची मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवण्यात द्राक्षासोबत बेदाणाही (Bedana Production) मोठा हातभार लावत आहे. पूर्वी द्राक्ष बाजारभावात पडझड झाल्यावर शेतकरी बेदाण्याकडे वळत, परंतु जागतिक बाजारपेठ खुली झाल्याने शेतकरी बेदाणे निर्मितीसाठीही द्राक्ष पिकवत आहेत.
द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यात द्राक्ष हंगाम (Grape Season) सुरू होताच बेदाणा निर्मिती उद्योग उभारणीने वेग घेतला आहे. द्राक्ष लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने द्राक्षशेती विस्तारत आहे. द्राक्षाची निर्यात, लोकल मंडीत विक्री यासोबत उपउत्पादन असलेल्या बेदाण्यांवर शेतकऱ्यांची मदार टिकून आहेत. द्राक्ष तोडणी केल्यानंतर पॅकिंगची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत द्राक्षमण्यांची गळ होते. गळ झालेले द्राक्षमण्यांची थेट विक्री होत नसल्याने त्यावर प्रक्रिया करून बेदाणे निर्मिती प्रक्रिया केली जाते.
बेदाण्यांच्या आकार, रंग यावरून त्यांच्या दर्जा ठरवला जातो. बेदाणा निर्मितीसाठी प्रामुख्याने पत्रा व पेपर शेड या पद्धतीचे दोन प्रकारचे शेड उभारले जाते. १२ कप्यांचे पत्रा शेड हे पारंपरिक शेड असून, त्यासाठी तीन ते साडेतीन लाख खर्च येतो. पेपर शेड मध्ये ९ कप्पे असतात. या शेडच्या उभारणीस दोन लाखांचा खर्च येतो. निफाड तालुक्यात बेदाणे निर्मितीची साधारणतः दीड हजार शेड असतात.
पिवळा बेदाणा, काळा बेदाणा, नैसर्गिक बेदाणा या पद्धतीचा ७० ते ८० हजार टन बेदाण्याची निर्मिती दरवर्षी होत असते. बेदाणा निर्मिती उद्योगातून किमान एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. चार ते पाच महिन्यांत बेदाणेनिर्मिती उद्योगातून तालुक्यात कोट्यवधीची उलाढाल होत असते.
परदेशातही वाढली मागणी
बाजारात विक्रीसाठी १०० ग्रॅमपासून ते १ किलोपर्यंत पॅकेट बनवता येतात. त्याचप्रमाणे होलसेल विक्रीसाठी १० ते १५ किलोचे बॉक्स बनवता येतात. बेदाणा साठवणुकीसाठी सुधारित शितगृहांची निर्मिती केलेले आहेत. स्टोअर केलेल्या बेदाण्यांची अमेरिका, रशिया, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स याशिवाय मलेशिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, श्रीलंका या देशांमध्येही नाशिकचा बेदाणा पोहोचला आहे.
या सर्व बाजारपेठांमध्ये नाशिकच्या बेदाण्याने स्वतःची जागा निर्माण केली आहे. गावागावात बेदाणा शेड उभारले जात आहेत. यामुळे गावातील स्थानिक मजुरांना रोजगार मिळतो. काही व्यापारी बाहेरून येऊन शेड उभारण्यासाठी जागा भाडे तत्त्वावर घेत असल्याने जागा मालकांना आर्थिक आधार मिळतो.