Join us

Halad Market : हळदीची आवक वाढली, सांगली बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 6:28 PM

Halad Market : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात हळदीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. वाचा साप्ताहिक बाजारभाव..

Halad Market : सप्टेंबरच्या शेवटी हळदीच्या मार्केटमध्ये (Turmeric Market) वाढ झाली असून मागील आठवड्यात सांगली बाजारात हळदीची किंमत १६ हजार ५० रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सांगली बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

मागील आठवड्याची आवक पाहिली असता आवकेत काही अंशी वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या (Halad Market) आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ५४.४७ टक्के व ६१.६० टक्के इतकी वाढ झाली आहे. ०८ सप्टेंबर रोजी ०२ टन, १५ सप्टेंबर रोजी ०२ टन, २२ सप्टेंबर रोजी ०३ टन तर २९ सप्टेंबर रोजी हा आकडा चार टनांच्या पुढे गेला आहे. 

मागील आठवड्यात सांगली बाजारात १६ हजार ५० रुपये, नांदेड बाजारात १३ हजार ६५० रुपये, हिंगोली बाजारात १३ हजार १४३ रुपये, वसमत बाजारात १३ हजार ०८ रुपये, तर रिसोड बाजारात १२ हजार ८५० दर मिळाला. तर २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य १०८१.३४ दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत ७.१९ टक्के च्या सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी २०३१ पर्यंत १६४०.१३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

हळदीचे लागवडीखालील क्षेत्र

हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८० टक्के योगदान आहे, त्यानंतर चीन (८ टक्के), म्यानमार (४ टक्के), नायजेरिया (३ टक्के) आणि बांगलादेश (३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. सन २०२२-२३ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुमारे ८८३०० हेक्टर असून त्याचे उत्पादन ३२३२०० टन इतके होते. तर महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत.

संकलन : स्मार्ट प्रकल्प अंतर्गत माहिती विश्लेषण जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे.

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीसांगली