Halad Market : मागील आठवड्यात सांगली बाजारात हळदीची (Halad Market) किंमत रु. १३ हजार ३८८ प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मात्र जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी पाहता हळदीच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातील सविस्तर बाजारभाव पाहुयात...
महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २८.३९ टक्के व ३२.६४ टक्के इतकी घट झाली आहे. तर मागील आठवड्याचा बाजारभाव पाहिला असता रिसोड बाजार समितीत १३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल, बसमत बाजार समिती १३ हजार ९४५ रुपये प्रतिक्विंटल, हिंगोली बाजारात १३ हजार ३५८ रुपये, प्रतिक्विंटल नांदेड बाजारात १३ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल आणि सांगली बाजारात १३ हजार ३८८ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
तर २०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य १०८१.३४ दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत ७.१९ टक्के च्या सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी २०३१ पर्यंत १६४०.१३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल. त्यामुळे २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
भारताचे ८० टक्के योगदान
हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८० टक्के योगदान आहे, त्यानंतर चीन (८ टक्के), म्यानमार (४ टक्के), नायजेरिया (३ टक्के) आणि बांगलादेश (३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. सन २०२२-२३ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुमारे ८८ हजार ३०० हेक्टर असून त्याचे उत्पादन ३२३२०० टन इतके होते.
(स्रोत - हळद आउटलुक - अहवाल)