Harbhara Market : ऑक्टोबर २०२२ पासून हरभऱ्याच्या किंमती वाढत (Harbhara Bajarbhav) आहेत. ऑगस्ट २०२३ नंतर, त्या भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. तर यंदा म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ मध्ये ६ हजार ५०० रुपये ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल असतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाहुयात सविस्तरपणे...
मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख (Harbhara Market Rate) विक्री हंगाम असतो. चालू वर्ष नोव्हेंबर २०२३-२४ (२२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत) मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत थोडी कमी झालेली दिसून येत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये ती ०.५ लाख टन इतकी आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ०.६ लाख टन इतकी होती.
भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ७०- ७५ टक्के आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. देशभरात हरभऱ्याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो. हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. सध्याच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ही ५ हजार ६५० रुपये आहे.
भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे ११०.४ लाख टन होण्याची शक्यता आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन २९.७ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये २८.४ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात कमी झालेली आहे.
अशा असतील किमती...
मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या जानेवारी ते मार्च मधील सरासरी किंमती जानेवारी ते मार्च २०२२ मध्ये ४ हजार ६०७ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये ४ हजार ६८७ रुपये क्विंटल, जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये ५ हजार ७३५ रुपये क्विंटल, जानेवारी ते मार्च २०२५ मध्ये ६ हजार ५०० रुपये ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल असतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२२ पासून हरभऱ्याच्या किंमती वाढत आहेत. ऑगस्ट २०२३ नंतर, त्या भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत.