Join us

मेथी आरोग्यवर्धक पण भाव नाही... मेथी उत्पादक शेतकरी अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 10:07 AM

आरोग्यवर्धक असलेल्या मेथीच्या भाजीची चव खवय्यांसाठी वाढली असली तरी उत्पादकांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे.

लातूर : आरोग्यवर्धक असलेल्या मेथीच्या भाजीची चव खवय्यांसाठी वाढली असली तरी उत्पादकांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. पेरणी ते काढणीचा खर्च विचारात घेता उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याची ओरड आहे. लातूरच्या बाजारात दररोज जवळपास 15 ते 20 मेथीची जुडी विक्रीसाठी येत आहे. ठोक विक्री 200 ते 300 रुपये शेकडा सुरू असून किरकोळ विक्री 5 रुपयांत होत आहे. 

एकीकडे आरोग्य चांगले राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्या पाहिजेत. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असलेली मेथी नियमित खाणे गरजेचे आहे, सर्वसामान्यांच्या ही भाजी आहे. दोन महिन्यांपासून 30 रुपयांना विक्री झालेली जुडी आता 5 रुपयांवर आल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. लातूर शहरातील बार्शी रोडवरील रयतू बाजारात बर्दापूर, पळसप, कॉड, जागजी, पाखरसांगवी, बाभळगाव, औसा, रेणापूर आदी भागांतील अनेक शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. सध्या लातूरच्या बाजारात कोथिंबरीची जणू मातीच झाली आहे. दर घसरल्याने भाजी काढण्यासाठी लावलेल्या मजुरांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. 

आवक वाढली, मागणी घटली...

एकीकडे थंडीचा जोर ओसरला असला तरीही थंडीत मेथीची भाजी खाणे फायदेशीर ठरते. मेथीचा गुणधर्म मुळात गरम असला तरी तिचे फायदेही अनेक आहेत. यामुळे ग्राहकांची मागणी असते, आवक वाढल्याने ठोक बाजारात शंभर जुड्यांसाठी 200 ते 300 रुपयांचा दर आहे. किरकोळ विक्रीही ५ रुपयांत होत आहे. आवक वाढली असली ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. सोमवारी रात्रीच्या वेळी 10 रुपयांत तीन जुड्या विकल्या गेल्या. काहीजण तर न विकलेली भाजी जनावरांना टाकून जात आहेत. - गफूर शेस्व. भाजीपाला विक्रेते.

पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यास मदत...

मेथीची भाजी खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम करते. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत, डायबिटीजचा त्रास कमी, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल कमी होते,मासिक पाळीत आराम, त्वचेच्या समस्या दूर होतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. यासाठी हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्या पाहिजेत. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे.मेथीची भाजी शरिरासाठी पोषक आहे. अनेक जीवनसत्व या भाजीतून मिळतात. त्यामुळे मोठी मागणी ग्राहकांकडून या भाजीला असते. मात्र सध्या आवक वाढल्यामुळे बाजारात मेथीचा भाव बेभाव झाला आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमार्केट यार्डशेतकरीलातूर