Join us

द्राक्ष निर्यातीसाठी नव्या मार्गाचा अवलंब? निर्यातदारांना आर्थिक फटका बसणार 

By गोकुळ पवार | Published: December 31, 2023 11:31 AM

इस्त्रायल-हमास युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून सुएझ कालव्यातून होणारी द्राक्ष निर्यात बंद आहे.

इस्त्रायल-हमास युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून सुएझ कालव्यातून होणारी द्राक्ष निर्यात बंद आहे. मुंबईतील नाव्हा शेवा बंदरापासून सुएझ कालव्यामार्गे जाणारी वाहतूक बंद असल्याने आता न्यू केप ऑफ गुड होप या मार्गाने वाहतूक करण्याचा विचार आहे. मात्र जवळपास 19 हजार किलोमीटरचा मार्ग असणार आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातीवरच मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. राज्यातून द्राक्षेही मोठ्या प्रमाणावर इतर देशांमध्ये निर्यात केली जातात. मात्र, सध्या द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला असून द्राक्षांची निर्यात ठप्प झाली आहे. गाझाजवळील जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळे शिपिंग कंपन्यांनी भारतातून युरोपीय देशांमध्ये द्राक्षांची निर्यात बंद केली आहे. 

एकीकडे द्राक्षाची होणारी नेहमीची वाहतूक हि सुएझ कालव्याद्वारे होत असते. हे अंतर 7,200 किलोमीटरचे असून हे अंतर कापण्यासाठी 21 दिवस लागतात. मात्र याच मार्गावर सध्या वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. जर न्यू केप ऑफ गुड होपमार्गे द्राक्षांची निर्यात करण्याचा विचार केला तर हे अंतर जवळपास 19 हजार 800 किमी असेल आणि त्यासाठी किमान 34 ते 38 दिवस लागतील. याचा द्राक्ष निर्यातीवर मोठा आर्थिक परिणाम होईल आणि द्राक्षेही खराब होण्याची भीती आहे. एकूणच द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ही परिस्थिती निर्माण झाल्याने यावेळी द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत. अशा स्थितीत द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागू शकते.

अनेक गोष्टीचा खर्च वाढणार 

दरवर्षी निर्यातदारांकडून आठवड्याला सिजनमध्ये 80 ते 90 कंटेनर युरोपला जात असतात. मात्र सद्यस्थितीत केवळ 10 ते 15 कंटेनर जात आहेत. म्हणजेच केवळ 10 ते 15 टक्के निर्यात सुरु आहे. तर आठ ते दहा हजार कंटेनर सिजन मध्ये जात असतात, एका कंटेनरमध्ये 12 ते 14 टन माल असतो. परंतु इस्रायल आणि हमास युद्धामुळे द्राक्ष निर्यात थांबली आहे. लांबच्या मार्गाचा विचार केला जात आहे. मात्र याचा मोठा परिणाम निर्यातीवर होणार आहे. या लॉंग रूटच्या विचारामुळे निर्यातदारांनी काम थांबवलं असून न्यू केप ऑफ गुड होप या मार्गाने द्राक्ष निर्यात करायची ठरविल्यास अनेक गोष्टीचा खर्च वाढणार आहे. 

शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा 

अरबी समुद्र आणि लाल समुद्रातून जी वाहतूक होणार आहे, या सर्व वाहतूक दारांना निर्यात दारांना सुरक्षा पुरवणार असल्याचे आश्वासन सरकारने दिले असल्याचे देखील नाशिक येथील द्राक्ष निर्यातदारांनी सांगितले. जे काही हल्ले होत आहेत, हे देखील थांबवले जातील  असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दहा पंधरा दिवसांत द्राक्ष निर्यातीचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास देखील द्राक्ष निर्यातदारांना व्यक्त केला आहे. दरम्यान, सरकारने तातडीने कारवाई करून परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

काय होईल परिणाम?

समुद्रात मालवाहतूक खर्च, विमा प्रीमियम वाढणार आहे. केप ऑफ गुड होपमार्गे माल पाठवण्यास वेळ लागेल. युरोपमध्ये लोह आणि पोलाद, यंत्रसामग्री निर्यातीला फटका बसला वसून इतरही वस्तुच्या निर्यातीच्या आशावादावर पाणी फेरले जाईल, अशी स्थिती आहे. इस्त्रायल - हमास युद्धामुळे एपी मोलेर, एमएसी, सीएमए, सीजीएम आणि हपाग-लेयॉड आदी कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत लाल समुदाचा मार्ग टाळण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, नवीन मार्ग अजून ठरवायचा असून, त्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे कंपन्यांनी निर्यातदारांना कळविले आहे. 

टॅग्स :नाशिकशेतीद्राक्षे