Join us

Afgani Onion : अफगाणिस्तानच्या कांद्याची भीती कशाला? बाजारात अफवांचे पेव, जाणून घ्या संपूर्ण गणित

By गोकुळ पवार | Published: September 25, 2024 4:59 PM

Afgani Onion : अफगाणिस्तानचा भारतात आलेला कांदा इतका कमी आहे की  त्यातून एका शहराचीही एका दिवसाची गरज भागणार नाही.

Onion Import : एकीकडे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याला (Onion Market) समाधानकारक दर मिळत आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचाकांदा किरकोळ स्वरूपात  भारतात दाखल झाला आहे. यामुळे कांदा बाजारभावावर परिणाम होणार असल्याच्या अफवांना पेव फुटले. मात्र अफगाणिस्तानचा भारतात आलेला कांदा इतका कमी आहे की  त्यातून एका शहराचीही एका दिवसाची गरज भागणार नसल्याने देशातील, त्यातही नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या किंमतीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे या निर्यात क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. 

सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यामध्ये कांद्याची दररोज सुमारे सव्वा ते दीड लाख क्विंटल (Nashik Kanda Market) आवक होत आहे. तर कांदा बाजारभाव ४५ ते ५० रुपयांपर्यंत मिळत आहेत. अशा स्थितीत अफगाणिस्तानातून पंजाबमधील अमृतसर, जालंदर या शहरांमध्ये ११ मालट्रकमधून साधारण ३५० टन कांदा दाखल झाला आहे. या तुलनेत एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला, तर जवळपास दिवसभरात ७० टक्के कांद्याची आवक जिल्ह्यातून होते. म्हणजेच ४० हजार क्विंटलहून अधिक ही आवक असते. अशा स्थितीत अफगाणिस्तानहून आलेल्या कांद्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट होत असून शेतकऱ्यांना सध्या तरी काळजी करण्याचे कारण नसल्याचे दिसत आहे. 

आज दिनांक २५ सप्टेंबर २४ रोजी ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार भारताच्या उत्तर विभागात कांद्याला सरासरी 52 रुपये किलो दर मिळत आहे. तसेच पश्चिम विभागात 48 रुपये, पूर्व विभागात 51 रुपये, उत्तर पूर्व विभागात 62 रुपये तर दक्षिण विभागात 54 रुपये किलोचा दर मिळत आहे. तर आजच्या बाजारभाव अहवालानुसार दिल्लीतील आजादपुर बाजार समितीत  जास्तीत जास्त 5250 रुपये क्विंटल दर मिळाला. तर अफगाणिस्तानच्या कांद्याचा दर पाहिला असता तो 35 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सध्याच्या देशांतर्गत बाजार भावावर अफगाणिस्तानच्या कांद्याचा कुठलाही प्रभाव जाणवणार नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.

म्हणून अफगाणिस्तानला कांदा विकणे शक्य..... 

भारतीय बाजारपेठेत सध्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळत आहेत. हे बाजारभाव जास्त आहेत म्हणूनच अफगाणिस्तानला आपला कांदा भारतीय बाजारात विकणे शक्य होत आहे. अफगाणिस्तानचा कांदा भारतीय पाकिस्तानमार्गे भारतीय सीमापार आणण्यासाठी सुमारे ३ रुपयांचा तर अमृतसरपर्यंत आणण्यासाठी ५ रुपयांचा प्रति किलो खर्च येतो. सध्या हा कांदा सुमारे ३५ रुपये किलो प्रमाणे अमृतसरमध्ये मिळत असला, तरी त्याचा गडद लाल रंग आणि चवीला भारतीय कांद्यापेक्षा फिका असल्याने भारतीय ग्राहक या कांद्याला कमीच पसंती देतात. त्यामुळे सध्या तरी अफगाणिस्तानचा कांदा भारतीय बाजारात आला, तरी त्याने भारतीय कांदा बाजारातील किंमतींवर फरक पडण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

हे ही समजून घेऊया.. 

दरम्यान अफगानिस्तानातून जुलै महिन्यात पहिल्यांदाच ८ हजार मे. टन कांदा भारतात निर्यात झाला होता.तेथील कुनार प्रांतातून पाकिस्तानमार्गे हा कांदा भारतात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात भारतात दाखल झाल्याची माहिती अफगाणिस्तानचे अधिकृत सरकारी माध्यम रेडिओ ॲन्ड टेलिव्हिजन ऑफ अफगानिस्तानने दिली आहे. भारतीय वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशाने साधारणत: ८हजार मे. टनांच्या आसपास कांदा जुलै २४मध्ये आयात केलेला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी भारतात आलेल्या कांद्याची अफगाणिस्तानने कुठलीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे हा कांदा अफगाणिस्तानचा असला, तरी पाकिस्तान तो नफा कमविण्याच्या उद्देशाने भारतात पाठवत असल्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी बोलून दाखविली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणत आहेत. सध्या कांदा बाजारभाव समाधानकारक आहेत. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत. आता अफगाणिस्तानचा कांदा भारतात विक्रीसाठी दाखल झाला आहे. यावरून अनेक बातम्या आल्या की बाजारभाव घसरतील म्ह्णून..., पण याचा सध्याच्या कांदा बाजारभावावर कोणताही परिणाम होणार नाही. एकीकडे आपले बाजारभाव चांगले असल्याने अफगाणिस्तानला कांदा विक्री शक्य होत आहे. त्यामुळे सध्याचे कांदा बाजारभाव टिकून असणार आहे. - संजय लोंढे, सचिव, पिंपळगाव बसवंत बाजार समिती 

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रअफगाणिस्तान