- गोकुळ पवार
Nashik Kanda Market : गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांना कांदा बाजारभावातून (Kanda Market Price) दिलासा मिळत आहे. पोळ्याच्या आधी पासून बाजारभाव टिकून असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकजूट आणि शेतकरी संघटनांनी सोशल मीडियावरून केलेल्या जागृतीमुळे हे साध्य होताना दिसत आहेत.
एकजुटीच्या धोरणामुळे बाजारभाव टिकवून ठेवण्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यश आले असल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे. कारण ज्या दिवसापासून कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळू लागला आहे, त्यावेळी शेतकऱ्यांनी अगदी समंजसपणे कांद्याची आवक केल्याचे एकूण बाजारभाव अहवालावरून दिसून येते.
जवळपास वर्षभरापासून कांदा दर समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. निर्यात शुल्क असल्यामुळे कांदा निर्यात देखील रोडावली असल्याचं चिन्ह आहे. आणि यामुळे बाजार भाव जे आहेत, ते कमालीचे घसरल्याचे पाहायला मिळत होते. साधारण ऑगस्ट महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळू लागला होता. 04 हजार रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत आदर मिळत होता. अशा स्थितीत नाफेडने कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणला आहे. त्यामुळे बाजारभाव घसरतील अशी शक्यता होती. मात्र शेतकऱ्यांनी एकजूट दाखविली आणि एकदम कांदा बाजारात आणण्याचे टाळले. या त्यांच्या कमी आवकेच्या धोरणामुळे अद्याप तरी कांदा बाजारभाव टिकून असल्याचे चित्र आहे.
दरम्यान सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात विक्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली, याबाबत दोन्ही संस्थांनी निविदादेखील प्रसिद्ध केल्या. त्यानुसार साधारण 05 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत कांदा विक्रीला सुरुवातही झाली. या दरम्यान नाशिक जिल्ह्यात कांद्याला साधारण 04 हजार रुपयांपासून ते 4 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळत होता. यात काहीशी पडझड झाली असली तरीही सद्यस्थितीत 3800 रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत दर टिकून असल्याचे चित्र आहे.
म्हणून कांदा बाजारभाव टिकून....
ऑगस्ट महिन्यात कांद्याला चांगला बाजार भाव मिळू लागला आणि हळूहळू बाजार समित्यांमध्ये आवक ही वाढू लागली. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांनी यावर थोडा विचार करून एकजूट केली आणि कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याचे ठरवले, ज्यामुळे कांदा बाजारभाव अद्यापही टिकून आहेत. एकीकडे नाफेडचा कांदा बाजारात आला असला तरी कांदा बाजारभावावर फारसा परिणाम झाल्याचा दिसून येत नाही. कांदा उत्पादक शेतकरी टप्प्या टप्प्याने कांदा बाजारात आणत असल्याने हे बाजारभाव टिकून आहेत. शिवाय शेतकऱ्यांमध्ये बाजारभावाबाबत होत असलेली जनजागृती हे देखील मोठे यश म्हणावं लागेल.
शेतकऱ्यांनी एकाच दिवशी कांद्याची जास्त आवक वाढणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवेला बळी पडू नका, केंद्र सरकारचा बफर स्टॉक म्हणजेच नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात येईल तेव्हा येईल, मात्र आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री सुरू ठेवा. आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले दर मिळविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. -भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.