Cotton Market : गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) मुहूर्तावर धरणगाव येथे कापूस खरेदीस प्रारंभ (Cotton Market) करण्यात आला. पहिल्याच दिवशी कापसाला ७ हजार १५३ रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे. भौद, ता. धरणगाव येथील अधिकार पुंडलिक पाटील या शेतकऱ्याकडील कापूस पहिल्यांदा मोजण्यात आला. यावेळी काटा पूजन करण्यात शेतकरी, व्यापाऱ्यांना महाप्रसादाचा लाभही देण्यात आला.
श्रीजी जिनिंगमध्ये दिवसभरात २४०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जुन्या कापसाला ८ हजार रुपये आणि कवडीमालाला ५ हजार १०० रुपये एवढा भाव मिळणार आहे. काटा पूजन नयनकुमार गुजराथी, जीवनसिंह बयस, सुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन कापसाची माहिती घेतली व बाजारभाव जाणून घेतला.
जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी धरणगाव तालुक्यातील अधिकार पुंडलिक पाटील या शेतकऱ्याला कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार १५३ रुपये भाव देवून कापूस खरेदी केला. तर मागील वर्षी ५ हजार १५३ रुपयांचा दर कापूस खरेदी प्रारंभींवेळी देण्यात आला होता.
हंगाम चांगला; पण....
यावर्षीचा जळगाव जिल्ह्यातील कापसाचा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे. मात्र, जागतिक परिस्थिती बघता आणि गुजरात व तेलंगणामधील पूरस्थिती बघता कापसाचे भाव साडेआठ हजार रुपयांच्या आतच राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती जीवनसिंह बयस यांनी दिली.