धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील लाल मिरची सुद्धा तेवढीच प्रसिद्ध आहे. केशोरीच्या मिरचीची चव अनेक राज्यांना भावल्याने या मिरचीचा तोरा महाराष्ट्रासह इतरही राज्यात वाढू लागल्याचे चित्र आहे. मात्र अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी नाखुश असल्याचे चित्र आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात पारंपरिक धान शेती केली जाते. नगदी पिके नगण्य घेतली जातात. तर याच तालुक्यातील केशोरी येथील गाढवी नदीच्या काठावर वर्षानुवर्षे मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात केशोरी हे गाव मिरची उत्पादनासाठी सर्वत्र परिचित आहे. मिरचीचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कुठल्याही भाजीला मिरचीशिवाय चव येत नाही. वर्षातील बारा महिन्यांपैकी सहा महिने मिरची पिकासाठी शेतकरी आपला घाम गाळत असतात. साधारण सप्टेंबर महिन्यात मिरची पिकांच्या रोपांची गादी वाफ्याद्वारे लागवड करण्यात येते. मिरचीची झाडे कोवळी राहात असल्याने पावसापासून बचावासाठी शेतकऱ्यांना डोळ्यात तेल ओतून काळजी घ्यावी लागते.
ऑक्टोबरमध्ये जमिनीची मशागत करून मिरची झाडे लावण्यात येतात. साधारणत: फेब्रुवारी व मार्च महिन्यात मिरचीची तोडणी केली जाते. मिरचीला वाळवून ठेवण्यात येते. एका झाडाला जवळपास एक पाव फळे लागतात. मिरचीचे झाडे चांगली वाढावी म्हणून फुटाच्या अंतराने मिरचीची झाडे लावली जातात. केशोरी परिसरातील शेतकरी मागील ३५ ते ४० वर्षांपासून मिरचीचे उत्पादन घेत आहेत. सध्या या परिसरात मिरची तोडणीचा हंगाम सुरु आहे.
केशोरीची मिरची व्यापतेय बाजारपेठ
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या भागातून नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, येथील बाजारपेठेत मिरचीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केशोरीच्या मिरचीचा तोरा दिवसेंदिवस वाढत असून या मिरचीला आता बऱ्याच राज्यातून मागणी होत असल्याचे येथील शेतकरी विनोद पाटील गहाणे यांनी सांगितले.
मिरचीला हमीभाव केव्हा? अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मिरची व धान हे प्रमुख पीक असून उन्हाळ्याच्या दिवसात इडियाडोहपासून निर्माण झालेली गाढवी नदी केशोरी जवळून वाहते. याच नदीच्या पाण्याचा उपयोग करुन या परिसरातील शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. मिरचीला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांना पुरेसा फायदा मिळत नाही. त्यामुळे शासनाने मिरचीला हमीभाव जाहीर करावा अशी मिरची उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.