गेल्या १५ दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने भाज्यांच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत. हिरव्या मिरचीचा दर शंभरीच्या दिशेने झेपावत असून शेवगा, भेंडी, मेथी, कारल्याच्या दरातही तेजी आहे. मात्र दुसरीकडे रोजच्या वापरातील कांदा, टोमॅटो दरात मात्र सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज किरकोळ बाजारात भाजीपाल्याला काय दर मिळाला, हे पाहुयात..
नागपूरच्याबाजारातून आरमोरी येथे भाजीपाला विक्रीसाठी येतो. सद्यस्थितीत आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. गेल्या पंधरवड्यात मिरचीचे दर ८० रुपयांवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी ४० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीच्या दरात अचानक दुपटीने वाढ झाली आहे. केवळ हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, या पालेभाज्यांचे दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाळी भाजीपाल्यांची आवक कमी असल्याने दर तेजीत असल्याचे सांगितले जात आहे.
किरकोळ बाजारात भाजीपाला दर
कांदा 30 रुपये किलो, बटाटे 40 रुपये किलो फुलकोबी 40 रुपये नग, काकडी 40 रुपये किलो गाजर 40 रुपये किलो शिमला 120 रुपये किलो शेवगा साठ रुपये किलो भेंडी साठ रुपये किलो, टोमॅटो साठ रुपये, हिरवी मिरची 80 रुपये, कारले 60 रुपये, पत्ता कोबी 40 रुपये किलो मिळत आहेत. तर मेथीची जुडी 20 रुपये, कोथिंबीर 40 रुपये जुडी, पालक 20 रुपये असा भाव किरकोळ बाजारात मिळत आहे.
बाजार समितीती बाजारभाव
आज 20 मार्च रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार बटाट्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1700 रुपये दर मिळाला. तर फ्लॉवरला 900 रुपये पासून ते दोन हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. गवारला सरासरी पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला कोबीला प्रति क्विंटलमागे सरासरी 900 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. कोथिंबीर ला कोल्हापूर बाजार समितीत क्विंटल मागे 4 हजार 250 रुपये तर नागपूर बाजार समितीत क्विंटल ला 2550 रुपये दर मिळाला तर मुंबईत केवळ बाराशे रुपये दर मिळाला. दरम्यान मेथीच्या जुडीला कोल्हापूर बाजार समितीत क्विंटल मागे 05 हजार रुपयांचा दर मिळाला. तर मुंबई बाजार समितीत क्विंटल मागे केवळ 1500 रुपये दर मिळाला