Join us

Lal Kanda Bajarbhav : नवीन लाल कांदा बाजारात, क्विंटलमागे काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 2:19 PM

Lal Kanda Bajarbhav : बहुतांशी व्यापारी दसऱ्याला लाल कांदा खरेदी करून नवीन हंगामाचा व्यापार सुरु करतात.

Lal Kanda Bajarbhav : गेल्या अनेक वर्षांपासून विजयादशमीच्या (दसरा) (Dasara) मुहूर्तावर नवीन लाल (पावसाळी) कांदा खरेदी- विक्रीची (Lal Kanda Kharedi) परंपरा असलेल्या येथील स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समितीत तसेच खारी फाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये नवीन लाल कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केटमध्ये सर्वोच्च ७ हजार १०१ रुपये तर स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समितीत सर्वोच्च असा ६ हजार १६१ रुपये बाजारभाव मिळाला. 

बहुतांशी व्यापारी दसऱ्याला लाल कांदा खरेदी (Lal Kanda Bajarbhav) करून नवीन हंगामाचा व्यापार सुरु करतात. त्यामुळे बाजार समितीत विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल पावसाळी कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात येतो. त्याप्रमाणे यावर्षीही शनिवारी सकाळी दहा वाजता उमराणे बाजार आवारात विक्रीस आलेला नवीन लाल कांदा खरेदी- विक्रीचा शुभारंभ बाजार समिती प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी क्विंटलला ६ हजार १६२ रुपये दराने कांदा खरेदी केला. हा भाव मुहूर्तावर मिळाला आहे, तो शेतकऱ्यांनी गृहीत धरू नये, असे सांगण्यात आले आहे. 

उमराणेतील शेतकऱ्याच्या मालाला सर्वोच्च बोली उमराणे बाजार समितीप्रमाणेच खारी फाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्येही नवीन लाल कांदा लिलावाचा शुभारंभ व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व प्रतिष्ठित कांदा व्यापारी खंडू काका देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल यांच्या हस्ते करण्यात आला. उमराणे येथील शेतकरी किसन झिपा राठोड यांनी बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्यास राज ट्रेडर्सचे संचालक संतोष बाफना यांनी सर्वोच्च बोली लावत ७ हजार १०१ रुपये दराने खरेदी केला. 

चांदवडला लाल कांदा दाखल

चांदवड बाजार समितीत उन्हाळ व लाल कांद्याचे आगमन झाले. यात उन्हाळ कांदा २२०३-४४००-४१६०, उन्हाळ (गोल्टा/गोल्टी ३८६०, कांदा लाल ५७६-१५८१ याप्रमाणे भाव होते. शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घ्यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास २४ तासाच्या आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. २४ तासांनंतर पेमेंटविषयी येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असे सभापती संजय जाधव, उपसभापती डॉ. वैशाली जाधव, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिक