लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Market) माथाडी कामगार व मापारी कामावर हजर असताना देखील त्यांना मजुरीची रक्कम मिळत नसल्याने पुन्हा एकदा लेव्हीच्या प्रश्नावरून कामगारांनी लिलाव बंदचे संकेत दिले होते. मात्र कालच्या पत्रानंतर पुन्हा बाजार समिती प्रशासन आणि माथाडी, मापारी कामगार संघटनेमध्ये चर्चा करून हा बंद थांबविण्यात आला आहे. मात्र ३१ जुलैपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे व्यापारी व कामगारांमध्ये लेव्ही तसेच मजुरीच्या प्रश्नावरून वाद सुरू आहेत. न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे त्यावर अजूनही नाही. ठोस असा पर्याय निघालेला नाही. आता लासलगाव (Kanda Market) बाजार समितीत पुन्हा व्यापारी वर्गाने माथाडी कामगार व मापारी वर्गाची मजुरीची रक्कम दिलेली नसल्याचे सांगत त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा बाजार समिती प्रशासन दिला होता. यासंदर्भात लेखी पत्र बाजार समितीला माथाडी कामगारांच्या वतीने देण्यात आले होते.
याबाबत समितीचे कामगार संचालक रमेश पालवे यांनी बाजार समितीला लेखी निवेदन देऊन जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत कामगार कामावर हजर होणार नसल्याने कळवले होते. यामुळे बाजार समितीत सर्वच शेतीमालाचे लिलाव बंद पडणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र कालच बाजार समिती प्रशासन आणि कामगार संचालक यांच्यात चर्चा होऊन येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे लिलाव सुरु राहणार आहेत, अशी नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बंद शेतकऱ्यांना नुकसानदायक
दरम्यान २/३ महिन्यांपूर्वी याच कारणास्तव नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद राहिल्या होत्या. परिणामी अनेक ठिकाणी खासगी बाजार समिती सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील बाजार समिती संचालक मंडळाने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची व कामगारांची समजूत काढत बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत केले होते. त्यातच आता कुठे बाजारभाव काहीसा दिलासादायक असताना माथाडी-मापारी कामगारांनी संप पुकारणे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकते.
समित्यांचे कामकाज बंद होता कामा नये
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, बाजार समित्यांमध्ये शेतकरी सोडून इतर सर्व घटक नेहमी आपला दबावगट निर्माण करून राहतात काम नाही तर दाम नाही. याबाबत शेतकरी आग्रही आहे, परंतु जेथे काम असणार आहे, त्याचा मोबदला द्यायला शेतकरी तयार आहेत. कोणीही विनाकारण शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. कोणत्याही परिस्थितीत बाजार समित्यांचे कामकाज बंद होता कामा नये. अन्यथा शेतकरी पर्यायी व्यवस्था निर्माण करायला सक्षम आहेत.