Join us

Tur Chana Stock : काबुली चणासह तूर आणि चण्याच्या साठ्यावर मर्यादा, नेमकं कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 7:45 PM

Tur Chana Stock : केंद्र सरकारने काबुली चणासह तूर आणि चण्याच्या साठ्यावर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मर्यादा लागू केली

Tur Chana Stock : साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी तसेच तूर (Tur) आणि चण्याच्या (Chana) बाबतीत ग्राहकांना परवडेल अशा दरात ते  उपलब्ध करून देण्यासाठी, केंद्र सरकारने एक आदेश जारी केला आहे. ज्याअंतर्गत घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, मिलचे मालक आणि आयातदारांसाठी डाळींच्या साठ्यावर  मर्यादा घातली आहे.

काबूली चण्यासह तूर आणि चणा यांच्या साठा मर्यादा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निर्धारित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक डाळीला (Turdal) वैयक्तिकरित्या लागू होणारी साठा मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी 200 मेट्रिक टन; किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 मेट्रिक टन; मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी प्रत्येक रिटेल आउटलेटवर 5 मेट्रिक टन आणि डेपोमध्ये 200 मेट्रिक टन; मिल मालकांसाठी उत्पादनाचे शेवटचे 3 महिने किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25%, यापैकी जे जास्त असेल ती लागू राहणार आहे.

तूर आणि चण्याच्या साठ्यावर मर्यादा घालणे हा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांचा एक भाग आहे. ग्राहक व्यवहार विभाग स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलद्वारे डाळींच्या साठ्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होता. विभागाने, एप्रिल 2024 च्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारांना सर्व साठवणूक संस्थांद्वारे अनिवार्य स्टॉक प्रकटीकरण लागू करण्याबाबत कळवले  होते, ज्याचा पाठपुरावा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून  ते 10 मे या कालावधीत देशातील प्रमुख कडधान्य उत्पादक राज्ये आणि व्यापारी केंद्रांना भेटी देऊन करण्यात आला होता. व्यापारी, स्टॉकिस्ट, डीलर्स, आयातदार, मिल मालक आणि मोठ्या साखळीतले  किरकोळ विक्रेते यांच्यासोबत स्वतंत्र बैठका देखील घेण्यात आल्या जेणेकरून त्यांना साठ्याच्या वास्तविक  प्रकटीकरणासाठी आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात डाळी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करता येईल आणि संवेदनशील बनवता येईल.

इथे साठा घोषित करणे अनिवार्य 

आयातदारांच्या बाबतीत, आयातदारांनी सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या मंजुरीच्या तारखेपासून 45 दिवसांपेक्षा जास्त काळ आयात केलेला साठा ठेवू नये. संबंधित कायदेशीर संस्थांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp) साठ्याची स्थिती घोषित करायची आहे आणि जर त्यांच्याकडे असलेला साठा विहित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर 12 जुलै, 2024 पर्यंत विहित स्टॉक मर्यादेपर्यंत आणावा लागेल.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रतुराकेंद्र सरकार