Join us

Maize Market : मका बियाणे दर गगनाला तर शेतकऱ्याच्या मक्याला बाजारात काय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 4:35 PM

Agriculture News : एकीकडे मका बियाणे (Maize Seed) दर गगनाला असताना दुसरीकडे बाजारात मक्याला कवडीमोल भाव मिळत आहे.

 - प्रमोद पाटीलजळगाव : मक्याचे बियाणे (Maize Seed) ६०० रुपये किलो विक्री होत आहे, तर शेतकऱ्यांचा मका १२ रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या पेरणीचा हंगाम (Maize Sowing) सुरू आहे, तर अनेक शेतकरी गेल्या हंगामातील साठवून ठेवलेला माल विक्रीला काढत आहेत. त्यात मका १२ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर मक्याचे बियाणे ६०० रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहेत. या तफावतीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

सध्या मका बियाण्याची साडेतीन किलोची बॅग आहे. या पॅकवर २१०० रुपये एमआरपी आहे. हाच मका शेतकरी पिकवतो, तेंव्हा हंगामाच्या सुरुवातीला फक्त १२ ते १३रुपये किलो या दराने विकावा लागतो आहे. जो सधन शेतकरी आहे तो राखून ठेवतो. १८-२० रुपये किलो भाव मिळाल्यावर विकतो. त्यामुळे या बियाण्यांच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे. संकरित वाण तयार करताना कंपनीला खर्च येतो. मात्र, तरीही एवढी तफावत कशी, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. यासाठी सरकारने उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतीमालासाठी निश्चित केले पाहिजेत, अशी मागणी होत आहे. 

सरकारने यावर नियंत्रण आणले पाहिजे.... 

याबाबत एरंडोलचे  डी. पी. गंभीरे म्हणाले की, तालुका कृषी अधिकारी या कंपन्या खासगी आहेत. त्यामुळे संकरित बियाण्यांची किंमत कंपन्यांच ठरवतात, सरकारने यावर नियंत्रण आणले पाहिजे. तर कासोदा येथील सोसायटी चेअरमन दीपक वाणी म्हणाले की, विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या विषयावर चर्चा घडवून आणली पाहिजे.

आजचे मका बाजारभाव आजच्या बाजार भाव अहवालानुसार सर्वसाधारण बार्शी बाजारात सरासरी 2300 रुपये तर करमाळा बाजारात 2451 रुपयांचा दर मिळाला. तर लाल मक्याला अमरावती बाजारात 2062 रुपये, पुणे बाजारात 2750 रुपये तर अमळनेर बाजारात 2425 रुपयांचा दर मिळाला. तर लोकल मक्याला मुंबई बाजारात 3350 रुपये तर तासगाव बाजारात 2250 रुपये दर मिळाला. तसेच पिवळ्या मक्याला धुळे बाजारात 2465 रुपये, भोकरदन पिंपळगाव रेणू बाजारात  समितीत 2150 रुपये तर देवळा बाजार 2415 रुपयांचा दर मिळाला.

टॅग्स :मकामार्केट यार्डजळगावशेती क्षेत्र