नाशिक : नाशिकचा पारा यंदा 40 अंशापुढे गेल्याने टरबुजासोबतच शरीराला गारवा देणारी लिची बाजारात भाव खात आहे. या फळामुळे आरोग्यालाही मोठे फायदे होत असतात. सध्या बाजारात क्विंटलमागे तब्बल 20 हजार रुपयांचा दर मिळत आहे. मुंबई फ्रुट मार्केटला लिची दाखल होत असून सद्यस्थितीत किलोमागे 200 ते 300 रुपयांचा दर मिळत आहे.
लिची हे अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे. लिची उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते. लिचीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यात भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. लिचीमध्ये व्हिटॅमिन-सी देखील असते. फळ महाग असले तरी त्याची मागणी वाढली आहे. लिची खाल्ल्याने निरोगी राहण्यास मदत होते. लिचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. लिचीमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये 'व्हिटॅमिन-ई' असते, यामुळे केस आणि त्वचा निरोगी राहते.
लिचीची आयात महाराष्ट्रातील महाबळेश्वर व इतर भागांतून होते. येथे रायपूर येथून माल आणला जातो. बिहारमध्ये लिचीची सर्वाधिक लागवड होते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, मणिपूर, आसाम, आणि मिझोरममध्येही लागवड होते. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी रसदार फळे खाल्ली जातात. या फळांमुळे झटपट ऊर्जा व गारवादेखील मिळत असतो. लिची देखील याच प्रकारातील फळ आहे. मात्र, मधुमेह असलेल्यांनी लिची खाणे टाळले पाहिजे. तसेच उपाशीपोटी या फळाचे सेवन करू नये, असे आरोग्य विषयक तज्ज्ञ सांगतात. साधारण सहा हजार रूपये क्विंटल असाच लिचीचा भाव असतो.
असे आहेत आजचे दर
मागील काही दिवसांचा बाजार भाव पाहिला असता 17 मे रोजी मुंबई मार्केटला लिचीला क्विंटल मागे सरासरी वीस हजार रुपयांचा दर मिळाला त्यानंतर 18 मे रोजी सरासरी 20 हजार रुपये, 21 मे रोजी 20 हजार रुपये, तर 22 मे रोजी देखील 20 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. एकूणच मागील तीन चार दिवसांत भाव स्थिर असल्याचे चित्र आहे. या बाजारभावानुसार लीचीला किलोमागे 200 रुपयांचा दर मिळतो आहे.