नागपूर : अवकाळी पाऊस, गारपीट, धुके अन् रोगराईच्या संकटांचा सामना करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर पिकवली. मात्र, ती बाजारात आणण्यापूर्वी दर गडगडले. सध्या शेतकऱ्यांच्या तुरीला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सरासरी कमीत कमी 07 तर सरासरी नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. दुसरीकडे त्याच तुरीच्या डाळीचे भाव सरासरी 14 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. त्यामुळे तर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
नागपूर विभागासह राज्यातील काही जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पन्न काढले जाते; मात्र अलिकडच्या काळात वर्षांत हे पीक ऐन जोमात असताना अवकाळी पाऊस, गारपिटीच्या तडाख्यात सापडत आहे. याशिवाय फुल धारणा आणि शेंगा पकडण्याच्या अवस्थेत विविध प्रकारच्या किडींचा तुरीवर प्रादुर्भाव जाणवत असल्याने सरासरी उत्पन्नात कमालीची घट होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. दुसरीकडे महत्प्रयासाने उत्पादित तूर बाजारात विक्रीला आणण्यापूर्वी दर गडगडण्याची समस्या ही बळावली आहे. तथापि, डिसेंबर 2023 च्या सुरूवातीस तुरीला चांगले दर मिळायला लागले होते; मात्र नवी तूर बाजारात यायला सुरूवात होताच दर घसरून 7 ते 9 हजार रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावले, सध्याही अशीच स्थिती कायम आहे. त्यातुलनेत तूर डाळीचे भाव प्रतिक्विंटल 13 ते 15 हजार रुपयांवर पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कधीकाळी तूर पिकाला सर्वाधिक पसंती दिली जायची. त्यामुळेच शेकडो हेक्टरवर तुरीची लागवड केली जायची. गेल्या काही वर्षांपासून माव अवकाळी पाऊस, गारपिट, ढगाळी वातावरण, धुके, शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आदि स्वरुपातील संकटाची मालिका सुरु आहे. अशात भाव देखील मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
केवळ जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था
यावर्षी तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. शेतकऱ्याला पाच एकरात केवळ साडेतीन क्विंटल उत्पादन झाले आहे. त्यामुळे विक्रीसाठी तुरीची काढणी करणे परवडत नसले तरी शेतकरी केवळ जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था होण्याकरिता काढणी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोयाबीन, कपाशीसोबतच तूर पिकाने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. पेरणीपासूनच तूर पिकाला विविध संकटांचा सामना करावा लागला. तुरीची काढणी करताना शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे जात आहे. मात्र, पशुधनाच्या वैरणीचा प्रश्न सुटावा म्हणून काढणी करण्यात येत आहे.
आजचा तूर, तूरडाळ बाजारभाव
आज मुंबई मार्केटचा विचार केला असता या ठिकाणी मुंबई लोकल 1758 क्विंटल इतक्या तूरडाळीची आवक झाली. तर कमीत कमी 9200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर सरासरी 13 हजार 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर दुसरीकडे तुरीचा विचार केला तर नागपूर बाजार समितीमध्ये आज तुरीची 1788 क्विंटल इतकी आवक झाली. या लाल तुरीला कमीत कमी 8400 प्रति क्विंटल दर मिळाला. तर सरासरी 9263 रुपये इतका दर मिळाला. त्यानुसार तूरडाळ वरचढ राहिल्याचे दिसून आले.