नाशिक : शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या कांदा व भुसार मालावर दोन टक्के हमाली, तोलाई आता कापली जाणार नाही, असा निर्णय जिल्हा व्यापारी असोसिएशनने चार दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र, या निर्णयानंतर अनेक मतप्रवाह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या विषयावर तोडगा निघेपर्यंत जिल्ह्यातील बाजार समितीत शेतमालाचा लिलाव गुरुवारपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. सदर निर्णय माथाडी-मापारी कामगारांनी घेतला आहे. शिवाय अनेक बाजार समित्यांना हा निर्णय मान्य नसल्याचे देखील समोर आले आहे. नेमक हे प्रकरण काय आहे पाहुयात..
नेमकं प्रकरण काय?
२००८ साली लेवीसह मजुरीची रक्कम वजा केली जात असे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हिशोब पावतीतून कपात केली जात असे. लेव्हीसह मजुरीची रक्कम शेतकऱ्यांकडून कपात केली जात असल्याने त्यावेळी काही शेतकऱ्यांनी मिळून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने सांगितले ही रक्कम खरेदीदार यांच्याकडून कपात करावी.. मात्र या निर्णयानंतर व्यापारी असोशिएशनने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. मुंबई हायकोर्टाने ही बाब स्थानिक जिल्हा न्यायालयात मांडण्यास सांगितले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी निफाड न्यायालयात दावे दाखल केले.
याचवेळी मात्र माथाडी बोर्डाने व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवल्या. या नोटिसानुसार लेव्हीची रक्कम शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्याकडून वसूल करावी असे सांगण्यात आले. सद्यस्थितीत ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने हा तिढा सुटलेला नाही. मात्र शेतकऱ्याकडून हमाली तोलाईची रक्कम वसूल केली जात आहे. मात्र लेव्हीसाठी व्यापाऱ्यांना तगादा लावला जात आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी ठरवलं की शेतकऱ्यांकडून मजुरी घ्यायचीच नाही, म्हणजे लेव्हीचा प्रश्नच उदभवणार नाही. मात्र आता या निर्णयाच्या पार्शवभूमीवर नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करणारा असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
लिलाव सुरु करावेत....
तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बाजार समित्या बंद ठेवता येत नाही. मार्केट बंद ठेवण्याचे कारण नाही. रोजचाच रोज कांदा निघून जात असतो. मात्र सद्यस्थितीत तीन चार दिवसापासून बाजार बंद असल्याने उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक गोष्टींची अडवणूक झाली आहे, लिलाव बंद झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक चणचण झाली आहे. त्यामुळे लिलाव बंद न ठेवता लिलाव सुरु करण्यात यावे, असे आवाहन कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.