Join us

Mirchi Market : मिरची तोडणीला ब्रेक, दिवाळीत तोंडावर उलाढाल मंदावली, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:00 AM

Nandurbar Mirchi Market : मागील पावसामुळे मिरची तोडणीला ब्रेक लागला आहे. परिणामी, नंदुरबार बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळे मिरची तोडणीला (Mirchi Production) ब्रेक लागला आहे. परिणामी, नंदुरबार बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे. हंगाम सुरू होऊन दीड महिना होऊनही बाजारात अद्याप केवळ चार हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. शुक्रवारी त्यात ५०० क्विंटलची भर पडली आहे. 

नंदुरबार (Nandurbar), शहादा आणि तळोदा तालुक्यासह नवापूर तालुक्यातील विविध भागात मिरची लागवड (Chilly Cultivation) करण्यात आली आहे. साधारण ६ हजार हेक्टरवर यंदा मिरची लागवड करण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर प्रारंभीपासून मिरचीची तोड सुरू झाली होती. यंदा पाऊस चांगला असल्याने मिरचीचे उत्पादन अधिक येण्याचे आडाखे बांधले जात होते. या अंदाजांना खरे ठरवत झाडांवर मुबलक मिरची उत्पादन आले होते. यातून नंदुरबार बाजारपेठेत (Nandurbar Mirchi Market) आवक सुरू झाली होती. 

सुरुवातीला वाढलेली आवक पावसामुळे कमी होऊन बाजारपेठ ठप्प झाली होती. १९ ऑक्टोबरच्या पावसानंतर ओलावा कायम असल्याने ही आवक अत्यंत कमी झाली आहे. गत दीड महिन्यापासून सुरू असलेल्या खरेदी हंगामात आतापर्यंत ४ हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे. यात लाली, गौरी, शार्कवन या वाणांची सर्वाधिक आवक आहे. या वाणाला शुक्रवारी २ हजार ३११ ते ५ हजार ५८७ रुपयांचा प्रतिक्विंटल दर देण्यात आला. 

गेल्या आठवड्याच्या तुलनेत शुक्रवारी दरांमध्ये ४०० रुपयांपर्यंतची वाढ झाली होती. यामुळे ८० वाहनातून शेतकरी मिरची घेऊन आले होते. परंतु दिवाळीतील ही आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दर दिवशी २ हजार ५०० क्विंटल मिरची आवक होत होती. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत एका दिवसात केवळ ५०० क्विंटल मिरची आवक होत असल्याच्या नोंदी होत आहेत.

हिरव्या मिरचीला वाढीव भाव... सध्या बाजारात हिरव्या मिरचीचा तुटवडा आहे. यामुळे हिरवी मिरची ६० रुपये प्रतिकिलो दरात व्यापारी खरेदी करत आहेत. हे दर अधिक असल्याने शेतकरी झाडावर मिरची लाल होण्यापूर्वीच तिचा तोडा करून घेत आहेत. परिणामी लाल मिरचीची आवक कमी आहे. यात पावसामुळे ओली जमिनही मिरची तोडणीसाठी मजुरांना अडचणीची ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

नंदुरबार बाजार समितीत मिरची आवक सध्या कमी आहे. शुक्रवारी ८० वाहने आली होती. पावसामुळे शेतात ओलावा असल्याने मजूर मिरची तोड करत नसल्याने या समस्या निर्माण होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. - योगेश अमृतकर, सचिव, बाजार समिती, नंदुरबार,

टॅग्स :मिरचीशेती क्षेत्रनंदुरबारशेती