जळगाव : खरीप हंगामातील मूग व उडीदचा (Mug Market) नवीन माल आता बाजारात दाखल होऊ लागला आहे. मात्र, सद्य:स्थितीत माल ओला असल्याकारणाने ओला माल खरेदी करण्यास व्यापाऱ्यांकडून नकार दिला जात आहे; तर काही व्यापाऱ्यांकडून कमी दरात हा माल खरेदी केला जात आहे.
यंदा अतिपावसामुळे (Heavy Rain) मूग व उडीद या पिकांना मोठा फटका बसला आहे. हमीभाव चांगला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावाएवढा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाकडून मूग व उडिदाची शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरवर्षी, शासनाकडून हंगाम संपल्यानंतर व मालाची जवळपास विक्री झाल्यानंतर शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली जातात.
त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होत नाही. शेतकऱ्यांकडील मालाची विक्री झाल्यानंतर शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यास त्या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होतो. त्यामुळे शासनाने सप्टेंबर महिन्यातच खरेदी केंद्रे सुरू करावीत अशी मागणी होत आहे.
मूग, उडदाच्या उत्पादनात घट गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे मान्सूनची स्थिती बदलली आहे. या बदललेल्या स्थितीमुळे सर्वाधिक फटका हा शेतीला बसत आहे. विशेषकरून खरीप हंगामात मूग व उडीद या पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. जिल्ह्यात मूग व उडदाची लागवड कमी होत आहे. त्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये मूग व उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा लागवडीसोबतच उत्पादनात घट झाली आहे.
सध्या जो माल बाजार समितीत येत आहे. तो माल ओला आहे: त्यामुळे हा माल घेण्यास व्यापारी नकार देत आहेत किंवा कमी भावात खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांना आपला माल बाजार समितीत आणताना तो कोरडा करून आणल्यास मालाला चांगला भाव मिळू शकतो. - प्रमोद काळे, सचिव, बाजार समिती
वाचा मग, उडीद बाजारभाव
आज उडदाला पैठण बाजारात सरासरी 05 हजार 900 रुपये दर मिळाला. तर काल लासलगाव निफाड बाजार समितीत सर्वसाधारण उडदाला सरासरी 06 हजार 500 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात 10 हजार 650 रुपये बीड बाजारात 6240 रुपये, लातूर बाजारात 7800 रुपये, अकोला बाजारात 6522 रुपये, गेवराई बाजारात 06 हजार 300 रुपये, तर सोलापूर बाजारात मोगलाई उडदाला 07 हजार रुपये दर मिळाला.
तर मुगाला लासलगाव बाजारात सरासरी 06 हजार रुपये, बार्शी बाजारात 5000 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 6825 रुपये, जालना बाजारात चमकी मुगाला 7421 रुपये, भोकरदन बाजारात 7200 रुपये, सोलापूर बाजारात हिरव्या मुगाला 06 हजार 825 रुपये, जालना बाजारात 8700 रुपये, पुणे बाजारात 09 हजार 750 रुपये दर मिळाला.