Join us

Onion Price NAFED : नाफेडचा 'या' आठवड्यासाठीचा कांदा दर निश्चित, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 1:28 PM

Onion Price NAFED : नाफेडने या आठवड्यात कांदा दर निश्चित केले असून नेमका काय भाव दिलाय?

NAFED Onion Rate : नाफेडकडून या आठवड्याचा कांदा खरेदी दर (Onion Market) निश्चित केला असून त्यानुसार 2555 रुपये प्रतिक्विंटल असा दर ठरविण्यात आला आहे. मागील दोन आठवडे हा दर केवळ 2105 रुपये प्रतिक्विंटल इतका होता. मात्र नाफेडकडून हे दर वाढणार असल्याचे संकेत दिले होते, त्यानुसार दरात वाढ झाली. परंतु बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत 2800 रुपयापर्यंत सरासरी दर मिळतो आहे. त्यामुळे नाफेडचा दर कमीच असल्याचे चित्र आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये  (Onion Market Yard) कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नाफेड खरेदी करत असलेल्या कांद्याचे दर निश्चितीचे अधिकार ‘डोका’ला मिळाले. त्यानंतर पहिल्या आठवड्यासाठी 2100 रुपये प्रति क्विंटल दर ठरवला. मात्र बाजारभावापेक्षा हा दर किमान पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एनसीसीएफच्या खरेदीकडे पाठ फिरवली. मात्र पुढील आठवड्यात या दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. त्यानुसार या आठवड्यासाठीचा नाफेडचा कांदा खरेदीचा दर 2555 प्रतिक्विंटल इतका आहे. मात्र मागील दोन आठवडे हा दर 2105 प्रतिक्विंटल इतका होता. 

दिल्लीतून ठरलेले नाफेडचे कांदा दर कमीच 

केंद्र सरकारच्या बफरस्टॉकसाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरवले जात होते. आता नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून ठरणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार असे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात आजही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात मिळणाऱ्या दरापेक्षा नाफेडचे दर कमी आहे. मागील दोन आठवड्यांसाठी नाफेडच्या कांदा खरेदीचे प्रतिक्विंटलसाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा दर हा 2105 रुपये होता. मात्र या आठवड्यात दर वाढवूनही बाजार समित्यामध्ये मिळणाऱ्या दरामध्ये तफावत असल्याचे चित्र आहे. 

तर कांदा दिला जाणार नाही.. 

आज मंगळवारी दिल्लीतून ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या आठवड्यासाठी नाफेड कांदा खरेदीचा दर 2555 रुपये प्रति क्विंटल इतका ठरवला आहे. आज नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात 2800-3000 पर्यंत प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. मात्र असे असताना सरकार नाफेडच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचे दर मात्र बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकऱ्यांकडून नाफेड व एनसीसीएफला कांदा दिला जाणार नाही असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. 

Nafed Onion Price: नाफेडच्या खरेदी केंद्रावर पुढील आठवड्यात दर वाढणार? जाणून घ्या

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रकेंद्र सरकार