Nafed Onion Scam : साधारण दीड महिन्यापूर्वी लोकमत ऍग्रोच्या माध्यमातून सडक्या कांदा विक्रीचा स्टिंग ऑपरेशन (Kanda Scam) समोर आणण्यात आलं होतं आणि यानंतरही हा नाफेडचा कांदा घोटाळा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते गोरख संत व किरण सानप यांनी पुन्हा एकदा नाफेडचा कांदा खरेदी भ्रष्टाचार (Nafed Kanda Ghotala) उघडकीस आणला आहे. यात लक्षात आलं की उन्हाळ कांदा खरेदी केला आणि बाजारात जाताना तो लाल कांदा झाल्याचं पुढे आलं आहे.
कांदा हे (Kanda Crop) अतिशय संवेदनशील पीक आहे. मात्र या पिकाच्या बाबतीत नेहमीच दुजाभाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून उन्हाळ कांद्याची खरेदी केली, ही खरेदी देखील कागदोपत्री आहे आणि हा खरेदी केलेला कांदा मागील सप्टेंबर महिन्यापासून देशभरात वितरित केला जात आहे. मात्र जो कांदा पाठवला जात आहे, तो उन्हाळ कांदा नसून लाल कांदा असल्याचं समोर आल आहे, शिवाय हा कांदा ए ग्रेड प्रतीचा नसून अगदी दुय्यम दर्जाचा असल्याचं वारंवार दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर गोरख संत आणि सानप यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकावर जाऊन या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. यापूर्वी कसबे सुकेने स्थानकावरून सडका कांदा पाठवला जात असल्याचे प्रकरण संत यांनी उघडकीस आणले होते. आता पुन्हा एकदा संत आणि किरण सानप यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावर जात ज्या रेल्वेतून हा कांदा पाठवला जात आहे, त्या बोगी नंबर 15 मध्ये जाऊन कुठल्या प्रतीचा कांदा पाठवला जात आहे, हे समोर आणले.
एकीकडे 45 एमएम चा कांदा खरेदी केल्याचे नाफेड सांगत असले तरीही पाठवला जाणारा कांदा मात्र 15 ते 20 एमएम प्रतीचा असल्याचे दिसून आले. शिवाय यात बहुतांश सडका कांदा देखील नेला जात आहे. हे करत असताना व्यापाऱ्यांच्या संबंधित काही व्यक्तींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, व्हिडिओ डिलीट करा'असे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे स्थानिक रेल्वे पोलिसांनी देखील याबाबत विचारणा करत थेट गुन्हा दाखल इशारा दिल्याचे संत यांनी सांगितले. तर लासलगावहुन चार दिवसांचा प्रवास करून कांदा दिल्लीत पोहचतो. मात्र इथंच कांद्याची अवस्था खराब असताना दिल्लीत जाईपर्यंत संपूर्ण गोणी खराब होत नसेल कशावरून, असा सवाल देखील किरण सानप यांनी उपस्थित केला.
नाफेडने भ्रष्टाचार केला असून रेल्वेने पाठवल्या जात असलेल्या बोगीतून कोणताही A ग्रेडचा कांदा मिळाला नाही, त्यात गोल्टी किंवा सडके कांदे मिळाले. जे काही चांगले होते ते सगळे कांदे खरं तर 45 एमएमचे असायला हवे, परंतु ते साधारणपणे 15 ते 20 एमएमच्या आतले आहेत. त्यामुळे हा भ्रष्टाचारच आहे, यात शंका नाही, केंद्र सरकार आणि राज्य सरकार नाफेडवर काय कारवाई करणार आहे, का या भ्रष्टाचाराला असेच पाठीशी घालणार का? असा सवाल आहे.
- गोरख संत, सामाजिक कार्यकर्ते