Join us

Jawar Market : ज्वारी खरेदीची प्रक्रियाच खोळंबली, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 4:39 PM

Jawar Market : आता गोदामच मिळत नसल्याच्या कारणावरुन ज्वारी खरेदीची (Jawar Bajarbhav) प्रक्रियाच खोळंबली आहे. 

यवतमाळ : महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत ज्वारीची नाफेड करून खरेदी केल्या गेली. काही दिवसांपासून पोर्टल बंद झाल्याने खरेदी बंद झाली होती; परंतु आता गोदामच मिळत नसल्याच्या कारणावरुन ज्वारी खरेदीची (Jawar Bajarbhav) प्रक्रियाच खोळंबली आहे. 

मागील महिन्यात सुरू झालेली नाफेडची (NAFED) ज्वारी खरेदी केवळ १३ शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदीनंतर बंद करण्यात आली. त्यावेळी केवळ ५५० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी कधी करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात शासनाकडून ज्वारी खरेदीचे पोर्टल बंद करण्यात आले होते. आता नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची ज्वारी लवकरात लवकर खरेदी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुरुवातीला कळंब तालुक्यासाठी केवळ ५५४ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 

त्यानुसार तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ५५४ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली. त्यात केवळ १३ शेतकऱ्यांचा समावेश होता, तेव्हापासूनचा इतर शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला ज्वारी विक्रीचा प्रश्न असूनही सुटलेला नाही. खुल्या बाजारात ज्वारीची किंमत खूप खाली आली. नाफेडच्या ज्वारीची किंमत ३ हजार १८० इतकी आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग नाफेडच्या ज्वारी खरेदीची वाट पाहत आहे. तालुक्यातील २ हजार २०० क्विंटल ज्वारी विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली, परंतु आतापर्यंत केवळ १३ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यात आली. या संवेदनशील मुद्यावर लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली होती.

यावर कोण काय म्हणाले? 

कळंब येथील तहसीलदार धीरज स्थूल म्हणाले की, यापूर्वी शासनाच्या गोडावूनमध्ये ज्वारीची खरेदी करून साठवणूक करण्यात आली. आता तेथे जागा नाही. इतर खासगी व संस्थेच्या गोडावूनमध्ये बुक आहेत. गोडावूनसाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल. तर येथील खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक प्रवीण आगलावे म्हणाले की, बंद पडलेले पोर्टल सुरू झालेले आहे. ९५० क्चिटल खरेदीचे वाढीव उद्दिष्ट मिळाले आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर खरेदी सुरू होईल. तर शेतकरी आनंदराव जगताप म्हणाले की, ज्वारी विक्रीसाठी दोन महिन्यांपूर्वीच ऑनलाईन नोंदणी केली, परंतु अजूनही खरेदी करण्यात आली नाही. याविरोधात कोणी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची भूमिका घेऊन समोर यायला तयार नाही. शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही. 

टॅग्स :ज्वारीशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डयवतमाळ