Join us

एनसीसीएफच्या योजनेचा फज्जा, मोबाईल व्हॅनद्वारे कांदा विक्रीला 'नो रिस्पॉन्स' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 1:46 PM

Nashik : एनसीसीएफने सुरु केलेल्या 25 रुपयात कांदा विक्री योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

नाशिक : एनसीसीएफच्या माध्यमातून देशभरातील काही महत्वाच्या शहरात 25 रुपयात कांदा, 60 रुपयांत डाळ, 27  रुपये 50 पैशात आटा विक्री केली जात  नाशिकमध्ये सुरवात केल्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी साहित्य विक्री करणाऱ्या 15 मोबाइल व्हॅन कुठेही फिरकल्या नाही. कारण ग्राहकांकडून मागणी नसल्याने माल गाड्यांमध्ये लोड केला नाही, अशी सबब वाहनांवरील चालकांनी सांगितली. त्यामुळे एनसीसीएफने सुरु केलेल्या या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

एनसीसीएफच्या माध्यमातून दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई अन् आता नाशिक अशा 114 शहरांमध्ये 1155 मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जात आहे. आतापर्यंत 1 लाख 60 हजार 390 मेट्रिक टन कांदा विक्री केल्याची माहिती देण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 25 रुपये किलो कांदा, ६० रुपये किलो चणाडाळ अन् 27.50 रुपये याप्रमाणे आटा विक्रीचा प्रारंभदेखील व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र या योजनेस नाशिककरांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवशी तरी काही ठिकाणी गाड्या फिरल्या, मात्र दुसऱ्या दिवशी गाड्या कुठे गेल्याचे नसल्याचे वास्तव वाहनचालकांनी सांगितले. 

साधारण शेतकऱ्यांकडून एनसीसीएफने खरेदी केलेला माल साठवला जातो. हा माल मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकांना विक्रीसाठी नेण्यात येतो. म्हणजेच  मागणी झाली की माल गाड्यांमध्ये मोजून दिला जातो. मात्र सद्यस्थितीत मागणीच नसल्याने कदाचित आम्हाला तिथे वस्तू घेऊन जाण्याची सूचना दिली गेली नसावी, असे दोन ते तीन चालकांनी सांगितले. सिडको, इंदिरानगर, नाशिकरोड, सातपूर या भागात वाहन आलेच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जनजागृतीअभावी दुसऱ्याच दिवशी स्वस्त दरातील वस्तू मिळू शकल्या नाही. त्यामुळे सामान्य नागरिकापर्यंत एनसीसीएफच्या मोबाईल व्हॅनच पोहचल्या नसल्याचे चित्र आहे. 

नाशिकमध्ये एनसीसीएफची योजना

देशातील 114 शहरांमध्ये 1155 मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 25 रुपयाने किलो कांदा विक्रीची प्रतीक्षा होती. वितरणासाठी 15 मोबाइल व्हॅन नाशिकमध्ये फिरणार आहेत. एकाच वाहनात कांदा, डाळ व आटा असेल. वाहने शहरातील प्रत्येक भागात फिरतील. वस्तू घेताना प्रत्येक ग्राहकाचे नाव व मोबाइल नंबर वाहनावरील स्वतंत्र कर्मचारी नोंद ठेवतील. महिन्यातून दोनदा या वस्तू मिळतील. अशी एकूणच योजना आहे. मात्र  एकीकडे शेतकरी हतबल असताना दुसरीकडे आता एनसीसीएफच्या माध्यमातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

टॅग्स :नाशिकशेतीकांदा