नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथे पत्रकार परिषदेत दिली. खरेदीचे लक्ष्य ५ लाख मेट्रिक टन आहे. त्यात नाफेडसाठी २.५ आणि एनसीसीएफसाठी २.५ मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
रब्बी खरेदी पीएसएफ-2024 साठी एफपीओएस आणि शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साठवण उपलब्धता आणि एनसीसीएफची टीम खरेदीची तयारी तपासण्यासाठी विशाल सिंग पिंपळगाव बसवंत येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येत्या जूनपर्यंत नाशिक, पुणे, हरयाणा आणि गुजरात येथूनही पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदीचे लक्ष्य ५ लाख मेट्रिक टन आहे. त्यात नाफेडसाठी २.५ आणि एनसीसीएफसाठी २.५ मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
Onion Export duty : निर्यात मूल्य, शुल्कामुळे कांदा निर्यात वांध्यात, वाचा सविस्तर..
खरेदी धोरणाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना त्यांचा कांदा जमा करता यावा, यासाठी सुरुवातीला सुमारे 50 केंद्र उघडणार आहे. शेतकऱ्यांसाठी पेमेंट यंत्रणा थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे कार्यक्षमता सुनिश्चित असेल. 7 मेपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नाफेडचे पुणे शाखा व्यवस्थापक परिक्षित एम. एनसीसीएफचे शाखा व्यवस्थापक जितीन ग्रोव्हर उपस्थित होते. दरम्यान, निवडणूकीमुळे निर्यातबंदी उठवली असून एनसीसीएफ व नाफेडमार्फत कांदा खरेदीतून फायदा होणार नसल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांऐवजी पदाधिकारीच उपस्थित..!
पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याबाबत एनसीसीएफचे अध्यक्ष हे पिंपळगाव बसवंत येथे खरेदीची तयारी तपासण्यासाठी, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. मात्र साडेबारा वाजताची वेळ दिलेली असतानाही काही शेतकरी माघारी फिरले आणि त्याठिकाणी फार्मर कंपन्यांचे पदाधिकारी आणि व्यापारीच उपस्थित होते. यावेळी व्यापारी व फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.