यंदाच्या खरीप हंगामात मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्यांना विलंब झाला. सुरुवातीपासून कमी पाऊस व शेंगा, फुलधारणेच्या वेळी पावसाने मारलेली दडी यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले, त्यामुळे सरासरी उत्पादनात प्रचंड घट झाली. बाजारात दर चांगले मिळतील या आशाने शेतकऱ्यांनी शेतमाल साठवून ठेवला. परंतु दोन महिन्यांनंतरही बाजारात सोयाबीन साडेचार हजार ते पाच हजार प्रति क्विंटलमध्ये स्थिरावले असल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन किती दिवस घरी साठवून ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. पीक वाढीच्या काळात पावसाचा खंड असल्याने सोयाबीनचा बहर गळाला व त्यामुळे उत्पादनात कमी आलेली आहे. अशावेळी मागणी वाढून दरवाढ होण्याची शक्यता असताना डीओसीची मागणी घटल्याने सोयाबीन गडगडले आहे. सोयाबीनचे पीक बहरलेले असताना पावसाने दड़ी मारल्याने पिकाला फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिएकर सरासरी उत्पादन केवळ 3 ते 4 क्विंटलच झाले. त्यात सोंगणी, काढणी महागल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतक-यांना भाव वाढीची आसा असतानाच दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या आत स्थिरावले असल्याने शेतकरी स्तबल झाला आहे.
दोन वर्षापूर्वी मिळाला उच्चांकी दर
वर्षभरापासून सोयाबीनच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. त्या तुलनेत दोन वर्षापूर्वी उन्हाळ्यात सोयाबीनचे भाव 10 हजारांपर्यंत पोहोचले होते व त्यानंतर सातत्याने दरात घसरण होत आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन 4500 ते 4700 रुपये क्विंटलवर स्थिरावलेले आहेत. त्या तुलनेत सीड सोयाबीनचे भाव 5000 रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्यातरी दरवाढीची शक्यता नाही. तर व्यापारी म्हणतात की, गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत. पामतेलाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर झाला असून, दरवाढ होण्याची शक्यता दिसून येत नाही, आंतरराष्ट्रीय उलाढालीवर सध्या नजर आहे.
सोयाबीन उत्पादक म्हणतात....
पावसाच्या खंडामुळे वाढीवरच्या सोयाबीनचा बहर गळाला. याशिवाय काही भागात येलो मोडॉकचा प्रादुर्भाव वाढल्याने सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे. यंदा सोयाबीनच्या उत्पादनात कमी आलेली आहे. लागवडीचा खर्चही अधिक असल्याने चांगल्या दराची आशा आहे. त्यात सोयाबीनचे दर वाढत नसल्याने चिंता आहे.
भाव कधी वाढणार?
देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झालेली नसल्याने जानेवारी अखेरपासून काही प्रमाणात दरवाढीची शक्यता आहे. केंद्र शासनाने तेलाचे आयात शुल्क कमी केल्याने तेलाचे दर घसरले. त्यामुळे दरात कमी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी कमी झाली व दरातही घसरण झाल्याने सोयाबीन माघारले. सध्या महिनाभर तरी दरवाढीची शक्यता दिसत नसल्याची माहिती बाजार समितीच्या व्यापारी सूत्रांनी दिली.